उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योगांसाठी जागा, वीज, पाणी व पायाभूत सुविधांना प्राधान्य; वीजविषयक प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्याचे निर्देश


जळगाव, (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : जिल्ह्यात नवीन उद्योगांची उभारणी तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्ताराला चालना देण्यासाठी एमआयडीसीमध्ये आवश्यक जागा, वीज, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. उद्योजकांच्या विविध विभागांशी संबंधित अडचणींचा विभागनिहाय आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी निश्चित कालमर्यादेसह कृती कार्यक्रम तयार करावा. उद्योगांच्या वाढीतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार असल्याने उद्योग उभारणीस इच्छुक उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील नवीन उद्योग उभारणी, एमआयडीसीतील पायाभूत सुविधा आणि उद्योजकांच्या विविध अडचणींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, महावितरणचेमुख्य अभियंता मुलानी यांच्यासह महावितरण, महापारेषणचे कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता ईब्राहिम मुलाणी व दीपाली रास्वे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


या बैठकीत महावितरणशी संबंधित सर्वसामान्य ग्राहक, उद्योजक आणि शेतकर्‍यांच्या अडचणीही तातडीने सोडवाव्यात. उद्योगांचा खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमन तसेच एमआयडीसी परिसरातील बंद पथदिव्यांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढून उद्योगांना सुरळीत व शक्य तितका विनाव्यत्यय वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वाघूर पाणीपुरवठा योजनेची विद्युत लाईन वारंवार ट्रिप होऊन उद्योगांसह शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने चखऊउ व महानगरपालिकेने समन्वय साधून शटडाऊनचे योग्य नियोजन करावे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, जळगाव शहर व एमआयडीसीच्या भविष्यातील विकासाचा विचार करून पाणीपुरवठा, वीज वितरणासह आवश्यक मूलभूत पायाभूत सुविधांचे दीर्घकालीन नियोजन करावे. तसेच वीज वितरण यंत्रणेसाठी आवश्यक जागेची तरतूद भविष्यातील गरज लक्षात घेऊन नियोजनात ठेवावी, अशा सूचना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनी मांडलेल्या वीजविषयक प्रश्नांवर शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नियोजन करून संबंधित कामांवर एक महिन्याच्या कालमर्यादेत ठोस कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट निर्देश दिले.

आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या वीजविषयक तक्रारी तातडीने सोडविण्यावर महावितरणने भर द्यावा, महावितरणच्या विविध उद्घाटन कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एमआयडीसी आणि महावितरणने परस्पर समन्वयातून उद्योजकांच्या अडचणी मार्गी लावाव्यात, नियोजित वीजबंद अथवा भारनियमनाबाबत पूर्वनियोजन करून उद्योजक व नागरिकांची गैरसोय कमीत कमी होईल, यासाठी उपाययोजना कराव्यात, एम आय डी सी तील काही उद्योगांनी मांडलेल्या पॉवर फॅक्टरसंदर्भातील अडचणींकडेही महावितरणने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

उपकेंद्रांच्या कामांना गती देण्याच्या सूचना
शिरसोली येथील मंजूर 132 केव्ही उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करणे, जळगाव खुर्द व शिरसोली येथील महावितरणच्या उपकेंद्रांची कामे लवकर पूर्ण करून ती कार्यान्वित करणे तसेच एमआयडीसीतील एस सेक्टर व पी सेक्टरमधील उपलब्ध जागा ताब्यात घेऊन उपकेंद्राचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
सुनसगाव व वराडसीम येथील प्रस्तावित 132 केव्ही उपकेंद्र उमाळा येथे स्थलांतरित करता येईल का, याची आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय पडताळणी करण्याच्या सूचना महापारेषणला देण्यात आल्या. नवीन एमआयडीसी उपकेंद्रासाठी 50 एमव्हीए अतिरिक्त क्षमतेची तरतूद तसेच जुन्या 132 केव्ही उपकेंद्राची क्षमता वाढविण्याबाबत महापारेषणकडून बैठकीत माहिती सादर करण्यात आली.

केकत-निंभोरा येथील 132 केव्ही उपकेंद्रात अतिरिक्त बे तसेच महापारेषणच्या नवीन 132 केव्ही उपकेंद्रातून आणखी एक अतिरिक्त बे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानेही संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

एमआयडीसीतील पथदिवे, विद्युत खांबांबाबतही कार्यवाही
एमआयडीसी परिसरातील सर्व पथदिव्यांची देखभाल-दुरुस्ती करून ते नियमित सुरू ठेवावेत. जळगाव शहरातील अनावश्यक विद्युत खांब काढण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी तसेच विद्युत देखभाल-दुरुस्तीच्या वेळी हटविण्यात येणार्‍या झाडांच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट लावावी, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. जळगाव शहरातील वीज सुविधांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या.

बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या सर्व बाबींवर महावितरण, महापारेषण, एमआयडीसी, महानगरपालिका तसेच संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने तातडीने आवश्यक कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !