ह्योसंग इंडियाला 121.24 कोटींचे भांडवली अनुदान ; महाराष्ट्रात रोजगाराची नवी दारे खुली
छत्रपती संभाजीनगर (गुरुवार 10 सप्टेंबर 2026) : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना देतानाच वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी (शेंद्रा) परिसरातील ह्योसंग इंडिया प्रा. लि. या टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्पाला एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत 121 कोटी 24 लाख 84 हजार रुपयांचे भांडवली अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा निर्णय विशेष बाब म्हणून घेण्यात आला असून, सदर निर्णय अन्य वस्त्रोद्योग घटकांसाठी पूर्वोदाहरण ठरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच वर्षांत 1,273 कोटींची गुंतवणूक
ह्योसंग इंडिया प्रा. लि. हा टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कंपनीकडून आगामी पाच वर्षांत 1,273.33 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी स्थापित पात्र मशिनरीची मूळ किंमत 242 कोटी 49 लाख 68 हजार रुपये असून, त्याच्या 50 टक्के रकमेइतके म्हणजेच 121 कोटी 24 लाख 84 हजार रुपयांचे भांडवली अनुदान राज्य शासनाने मंजूर केले आहे.
सध्या 710 रोजगारांची निर्मिती
या प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीलाही मोठी चालना मिळणार आहे. सध्या प्रकल्पात 430 प्रत्यक्ष रोजगार, तर 280 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. आगामी विस्तारामुळे रोजगाराच्या संधींमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
टेक्निकल टेक्स्टाईलचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख
राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला टेक्निकल टेक्स्टाईल उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत मिळणार आहे. नवीन गुंतवणुकीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच विविध पूरक उद्योग आणि सेवांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित होत असून, तरुणांच्या हाताला रोजगार देणे हे राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठी संजीवनी : मंत्री सावकारे
ह्योसंग इंडिया या अद्ययावत प्रकल्पाला 121 कोटी 24 लाख रुपयांचे भांडवली अनुदान मंजूर झाल्याने वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठी संजीवनी मिळेल आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले.

