रावेरात रेल्वे तिकीटांची ब्लॅकने विक्री : संशयीत रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळ्यात
रावेर (गुरुवार 10 सप्टेंबर 2026) : सण-उत्सवामुळे रेल्वे गाड्यांना वाढलेल्या गर्दीमुळे रेल्वे गाड्या फुल्ल धावत असल्याची संधी साधून रेल्वे तिकीटांची जादा दराने ब्लॅकमध्ये विक्री करणार्या दलालांचा सुळसुळाटही वाढला आहे. रावेर रेल्वे स्थानकावर अशा पद्धत्तीने ब्लॅकने तिकीटांची विक्री केली जात असल्याची माहिती मुंबई दक्षता विभागाला मिळाल्यानंतर भुसावळ रेल्वे यार्डच्या मदतीने धडक मोहिम राबवत संशयीत दीपक गणेश चौधरी (32) यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या झडतीत 25 हजार 250 रुपये किंमतीची चार रेल्वे तिकीटे जप्त करण्यात आली. या कारवाईने अवैधरित्या रेल्वे तिकीटांची विक्री करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
जादा दराने तिकीट विक्रीची कबुली
यंत्रणेने संशयीत दीपक चौधरीची चौकशी केली असता त्याने खाजगी पीआरएस आयडीवरून जादा दराने रेल्वे तिकीटांची विक्री करीत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास एसआय विनीता शुक्ला करीत आहेत.

