भुसावळात ‘विघ्नहर्त्या’ चे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात आगमन

भुसावळ तालुक्यात 270 सार्वजनिक मंडळांत स्थापना ; सुमारे 29 हजार घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना ः पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भुसावळ शहरासह तालुक्यात सोमवारी भक्ती आणि उत्साहाचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला. सकाळपासूनच गणेशमूर्तींच्या आगमनासाठी रस्त्यांवर भाविकांची लगबग सुरू होती. ढोल-ताशांचा निणाद, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि फुलांच्या उधळणीत लाडक्या गणरायाचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरांत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये विधिवत पूजन करून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने संपूर्ण भुसावळ तालुका गणेशमय झाला.

270 मंडळांमध्ये श्रींची स्थापना
सोमवार, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर शहर आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. यंदा भुसावळ तालुक्यात तब्बल 270 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली. सुमारे 29 हजार घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील गल्ली-बोळांपासून ग्रामीण भागातील गावागावांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.




बाजारपेठेत चैतन्य
गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच भुसावळातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली. गणेशमूर्ती, पूजा साहित्य, फुले, पत्री, मखर तसेच सजावटीचे साहित्य व माव्याचे खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. शुभमुहूर्तावर घरगुती गणपतींची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

शहरात 185 सार्वजनिक मंडळांची स्थापना
भुसावळ शहरात यंदा एकूण 185 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. यामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 116, तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 69 मंडळांचा समावेश आहे.

मातृभूमी मंडळाचा ‘खान्देशचा राजा’, ‘श्रीराम नगरचा राजा’, ‘भुसावळकरांचा चिंतामणी’ तसेच जय गणेश फाउंडेशनचा ‘नवसाचा गणपती’ यांसह विविध मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि विविध देखाव्यांची तयारी केली आहे. अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला मंडपात आणले.

पर्यावरणपूरक उत्सवाला यंदा प्राधान्य
गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यावर यंदा अनेक मंडळांनी भर दिला आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्ती, नैसर्गिक रंग तसेच पर्यावरणस्नेही सजावटीच्या साहित्याचा वापर करण्याकडे भाविकांचा कल दिसून आला. काही मंडळांनी प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, जनजागृतीपर फलक आणि संदेशांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने शहर व तालुक्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सार्वजनिक गणेश मंडळे, प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच मिरवणूक मार्गांवर पोलिस कर्मचारी आणि होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भुसावळ शहरासह तालुक्यातील वातावरण भक्तिमय झाले आहे. पुढील दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !