वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाची विशेष मोहीम

भुसावळ शहरात प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक


भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : वनहक्कांच्या प्रलंबित दाव्यांचा आढावा घेऊन पात्र ग्रामस्थांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्याचा निर्धार भुसावळातील बैठकीत सोमवारी व्यक्त करण्यात आला. शहरातील दीनदयाल नगरात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला बोदवड, साईनगर तसेच भुसावळ परिसरातील सुमारे 225 आदिवासी बांधव उपस्थित होते.

सामूहिक वनहक्क दावे सादर करण्याचे आवाहन
या बैठकीत ग्रामस्थांनी वैयक्तिक तसेच सामूहिक वनहक्क दावे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले. जंगलात किंवा जंगलालगतच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांकडून वनउपजाचा पारंपरिक पद्धतीने वापर केला जातो तसेच काही ठिकाणी जंगलाच्या परिसरात वैयक्तिक शेतीही केली जाते. अशा ग्रामस्थांच्या वनहक्कांशी संबंधित प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने वनहक्क दाव्यांसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित गावांमध्ये दाखल करण्यात आलेले दावे, त्यासोबतची कागदपत्रे तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान दाव्यांचा आढावा घेऊन 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान ग्रामसभा घेऊन दाव्यांवर निर्णयाची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.




तहसीलदार, प्रांताधिकार्‍यांची भेट घेणार
या मोहिमेअंतर्गत 21 सप्टेंबर रोजी भुसावळ तसेच फैजपूर तहसीलदारांची भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर भुसावळ व फैजपूर प्रांत अधिकार्‍यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या वनहक्कांच्या प्रश्नावर चर्चा केली जाणार असून, प्रलंबित दाव्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

वनहक्क मिळण्यास विलंब का?
दरम्यान, भुसावळ व बोदवड तालुक्यातील एकाही गावाला अद्याप वनहक्काचे अधिकार स्पष्टपणे का देण्यात आलेले नाहीत ? असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला. पात्र ग्रामस्थांना वनहक्क मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणांची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी तसेच नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वनहक्कांच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी संघटित होऊन ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या दाव्यांशी संबंधित उपलब्ध कागदपत्रे व पुरावे सादर करावेत, असे आवाहन प्रतिभा शिंदे यांनी केले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे नेते चंद्रकांत चौधरी यांच्यासह मोर्चाचे कार्यकर्ते व असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !