यावल-पिंप्री रस्त्यावरील पाटाच्या पाण्यात अनोळखीचा मृतदेह आढळला


यावल (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : यावल ते पिंप्री जाणार्‍या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या पाटात सोमवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजेच्या सुमारास एका अनोळखीचा मृतदेह तरंगताना आढळला. यावल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

यावल पोलिसांची धाव
यावल-पिंप्री कच्च्या रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना पाटाच्या पाण्यात एक मृतदेह दिसताच त्यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे, उंची सुमारे 165 सें.मी., रंग निमगोरा आणि चेहरा गोल, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजी अक्षरात रमेश असे गोंदलेले आहे. उजव्या हाताच्या दंडावर धागा बांधलेला आहे तसेच कमरेला काळ्या रंगाचा करदोडा आहे.




मयताच्या अंगात तपकिरी रंगाची अंडरवेअर आहे. या वर्णनावरून संबंधित व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास किंवा कोणाचा नातेवाईक अथवा ओळखीचा व्यक्ती बेपत्ता असल्यास त्यांनी तात्काळ यावल पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावल पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !