जळगावातील बेपत्ता महिलेचा पद्मालयाजवळील जंगलात खून : संशयीताला अटक
प्रेमसंबंधाच्या वादातून प्रियकराने डोक्यात दगड घालून केली हत्या : नातेवाईकांचा संशय ठरला खरा
जळगाव (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : जळगावातून सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 38 वर्षीय महिलेचा एरंडोल तालुक्यातील पद्मालय जवळच्या जंगलात डोक्यात दगड टाकून सहकारी मित्रानेच खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली. कविता अरुण सुतार (38) असे खून झालेल्या महिलेचे तर नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (29, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
कविता सुतार या काही वर्षांपासून पतीपासून विभक्त राहून मुलांसह जळगावात वास्तव्यास होत्या. 8 सप्टेंबरपासून त्या बेपत्ता झाल्यानंतर याबाबत 9 सप्टेंबरला पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान कविता या नरेश सोनवणे याच्यासोबत दुचाकीवरून जाताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. कविताच्या मोबाईलचे लोकेशन म्हसावदजवळ मोबाईल बंद झाल्यानंतर समोर आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघेही सोबत दिसले. पोलिसांनी एरंडोलच्या दिशेनेही सोसीटीव्ही तपासल्यानंतर एरंडोलजवळील पद्मालयच्या जंगल परिसरात महिलेचा दगडाने चेहरा ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. नातेवाईकांना बोलावल्यानंतर त्यांनी कविताने घरातून निघताना घातलेले कपडे ओळखताच आक्रोश केला.



आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
संशयीत नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (29, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणातून अपहरण करीत विवाहितेचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली.
यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एमआयडीसी निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेडेड उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, हवालदार किरण चौधरी, हवालदार प्रमोद लाडवंजारी, हवालदार गिरीश पाटील, कॉन्स्टेबल विशाल कोळी, किरण पाटील, गणेश ठाकरे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.
