यात्रेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी वर्धा जिल्ह्यातील टोळी मेहुणबारे पोलिसांच्या जाळ्यात

तीन पुरुषांसह दोन महिला आरोपी अटकेत ; 8.19 लाखांचा मुद्देमाल जप्त ः आरोपींनी चाळीसगावसह नांदगाव व नाशिक बसस्थानकात चोर्‍या केल्याची दिली कबुली


मेहुणबारे (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील लांबेगाव येथील शेंद्रेबाबा यात्रोत्सवात गर्दीतील महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवणार्‍या वर्धा व अमरावती जिल्ह्यातील पाच जणांच्या टोळीला मेहुणबारे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलागाअंती बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या सोबत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन मिळून एकूण आठ लाख 19 हजार 682 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींनी चाळीसगाव बसस्थानकासह नाशिक व नांदगाव बसस्थानकातही चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे.

पाठलागानंतर टोळी जाळ्यात
19 रोजी एका महिलेने ग्रामदैवत शेंद्रे बाबा यात्रोत्सवात मंगळसूत्र चोरीची तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान संशयित आरोपी एम.एच.16 क्रमांकाच्या वाहनातून फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी जामदा फाटा येथे नाकाबंदी केली. संशयित वाहन चौकीपासून जामदा फाट्याकडे येताना दिसताच त्यास थांबण्याचा इशारा करूनही चालकाने सुसाट वेगाने वाहन जामदा गावाच्या दिशेने पळवले. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर सिमेंटच्या पोलमध्ये वाहन अडकल्याने महिला पसार झाल्या तर वाहनातून तीन पुरूषांना ताब्यात घेण्यात आले.

पाच आरोपी अटकेत ; महिला आरोपींचाही सहभाग उघड
आरोपींमध्ये सतीश तुकाराम चव्हाण (25), ओम तुकाराम चव्हाण (19), कुणाल सरनेरसिंग चव्हाण (19, तिन्ही रा.वॉर्ड नं. 5, सुंदरनगर, करळा रोड, वर्धा) यांना 19 रोजी अटक करण्यात आली तर पसार महिलांचा रहिपुरी परिसरात शोध घेतल्यानंतर मोनिका तुकाराम चव्हाण (23, रा.वॉर्ड नं. 5, सुंदरनगर, करळा रोड, वर्धा), सुभाना राकेश भोसले (19, जळगाव, आर्वी, अमरावती) यांना अटक करण्यात आली तसेच अन्य एका अल्पवयीनाही ताब्यात घेण्यात आले.

सोन्याचे दागिने, मोबाईल व कार जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये तीन लाख 80 हजार 882 रुपये किंमतीचे व 24.46 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (त्यात 17 नग मंगळसूत्राच्या वाट्या व 24 नग मंगळसूत्राचे मणी), 36 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन, तसेच चार लाख रुपये किंमतीची पांढर्‍या रंगाची मारुती स्वीप्ट डिझायर चारचाकी (क्रमांक एम.एच.16 ए.टी.6684) यांचा समावेश आहे. एकूण किंमत आठ लाख 19 हजार 682 रुपये आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, हवालदार किशोर पाटील, हवालदार शांताराम पवार, हवालदार देविदास पाटील, हवालदार मनोज पाटील, हवालदार प्रकाश कोळी, हवालदार प्रवीण पाटील, हवालदार राजेंद्र जाधव, हवालदार मुकेश देशमुख, कॉन्स्टेबल विनोद बेलदार, कॉन्स्टेबल कमलेश महाजन आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !