25 हजारांची लाच अंगलट : जामनेर तहसीलच्या महसूल सहाय्यकासह खाजगी वकिल एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : शेत रस्त्या संदर्भातील निकाल बाजूने देण्यासाठी 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकासह खाजगी वकिलाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंडळ खळबळ उडाली. प्रवीण सुपडू गांगुर्डे (41, प्लॉट नंबर 55, अयोध्या नगर, गणेश पार्कजवळ, जळगाव) असे अटकेतील खाजगी महसूल सहाय्यकाचे तर योगेश रामलाल वखरे (42, श्री स्वामी समर्थ नगर, जामनेर) असे खाजगी पंटराचे नाव आहे. वखरे हे व्यवसायाने वकिल आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्यासंदर्भातील प्रकरण जामनेर तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात अनुकूल कार्यवाही करण्यासाठी आरोपी महसूल सहाय्यकाने तक्रारदाराकडे प्रथम 30 हजार रुपये मागत 25 हजारावर तडजोड केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी तक्रार दाखल केली.

वकिलामार्फत स्वीकारली लाच
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान खाजगी इसम तथा व्यवसायाने वकिल असलेल्या योगेश रामलाल वखरे याने महसूल सहाय्यकासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम महसूल सहाय्यकाकडे देण्यात आल्यानंतर त्याने ही रक्कम पँटच्या उजव्या खिशात ठेवताच एसीबीच्या पथकाने दोघांना अटक केली. या प्रकरणात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, कॉन्स्टेबल राकेश दुसाणे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !