यावल तालुका खुनाने हादरला : किरकोळ वादातून दोघांनी केली मित्राची हत्या
मासे बनवल्यानंतर जेवण वडिलांना न दिल्याचा राग : दोघा आरोपींना अटक
फैजपूर (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : नॉनव्हेज जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मित्राच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद गावात रविवारी रात्री घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर दोन मित्रांनी सहकारी मजूर असलेल्या मित्रांच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला.
रमेश ईश्वरसिंग भंवर (35, रा.खंडवा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे तर या प्रकरणी संशयीत सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे यांना फैजपूर पोलिसांनी अटक केली.

काय आहे प्रकरण ?
पोलीस सूत्रानुसार रमेश भंवर, सुरज कोळी व गोलू नेमाडे हे तिघेही मित्र आहेत. मजुरी करून ते उदरनिर्वाह करतात व त्यांना एकत्र बसून दारू पिण्याचे व्यसन होते. रविवारी रात्री सुमारे 8 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास तिघेही भालोदला दारू पित असताना मृत रमेशने स्वखर्चाने आणलेले मासे मुकेश नामक मित्राकडे बनवण्यासाठी दिले होते व नॉनव्हेजचे जेवण आपल्या वडिलांनाही द्यावे म्हणून संशयीत सुरज कोळीने आग्रह धरल्यानंतर उभयंतामध्ये वाद झाला. यावेळी आरोपींनी रमेशच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी खुनानंतर मृतदेह एमएसईबीजवळील सुमारे 100 मीटर अंतरावरील खड्ड्यात टाकून पळ काढला.
फैजपूर पोलिसांची धाव
सोमवारी खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर फैजपूर सहा.निरीक्षक संदीप पाटील व सहकार्यांनी तत्पर कारवाई करीत धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे.


