एक लाखांची लाच घेताना अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
हाफ मर्डरचा गुन्हा दाखल न करता जामीन मिळण्यासाठी सहकार्य करण्यासाठी स्वीकारली लाच
अहिल्यानगर (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : हाफ मर्डरचा गुन्हा दाखल न करता जामीन मिळण्यासाठी सहकार्य व सौम्य स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तडजोडीअंती एक लाखांची लाच मागून ती स्वीकारताना पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला अहिल्यानगर एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. विनोद शिवाजी मासाळकर असे अटकेतील लाचखोर अंमलदाराचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदार यांचे हॉटेल आहे व त्याठिकाणी काम करणार्या नोकराचा एका अनोळखी ट्रक चालकासोबत कट लागल्यावरून वाद झाला. हॉटेलच्या नोकरावर हाफ मर्डरचा व रॉबरीचा गुन्हा दाखल करण्याची भीती आरोपी लोकसेवक मासाळकर याने घातली व तसे न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली व सौम्य स्वरूपाचा गुन्हा दाखल करून तपासात मदत करण्यासाठी एक लाख स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर पाथर्डी येथे सापळा रचण्यात आला.
पोलीस अंमलदाराने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष एक लाखांची स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली
ही कारवाईत पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे व पथकाने केली.


