टीईटी पेपरफुटीचे गूढ उकलले ; बीड-बिहारमधून पसार दोन आरोपींना बेड्या


भिवंडी (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत दीर्घकाळापासून पसार असलेल्या दोन संशयितांना बीड आणि बिहारमधून अटक केली. प्रकाश मिसाळ आणि अशोक साव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील सर्व 18 प्रमुख आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

चार राज्यांपर्यंत पोहोचले पेपरफुटीचे कनेक्शन
पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे तपास करत भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने फरार आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.

परीक्षेच्या एक दिवस आधी फुटला प्रकार
28 जून रोजी होणार्‍या ढएढ परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका विक्रीचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोणगाव परिसरात डमी ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान संशयितांकडून चार प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पडताळणीत हे संच मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले.

बुटाच्या इनसोलमध्ये लपवली होती प्रश्नपत्रिका
या प्रकरणाच्या चार्जशीटमधून पेपर चोरीची धक्कादायक पद्धत समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमधील दोन कर्मचार्‍यांनी आठ हजार रुपयांच्या मोबदल्यासाठी प्रश्नपत्रिका चोरी केल्याचा आरोप आहे. प्रेसमधून बाहेर पडताना प्रश्नपत्रिका बुटाच्या इनसोल आणि सॉक्समध्ये लपवण्यात आल्याचे तपासात नमूद आहे.

मुख्य सूत्रधारासह 18 जणांवर कारवाई
भिवंडी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात बिजेंद्र गुप्ता याच्यासह 18 आरोपींचा समावेश आहे. बिजेंद्र गुप्ता याच्यावर ओडिशातील कथित पेपरफुटीच्या प्रकरणातही गुन्हे दाखल असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. सर्व आरोपींवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !