शेतकर्यांच्या प्रश्नांवर आमदार अमोल जावळे आक्रमक : केळी विम्यातील तफावत दूर करण्याची मागणी
भुसावळ (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : नाशिकला झालेल्या आढावा बैठकीत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवत ठामपणे विविध मागण्या मांडल्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत पीक विमा, वीजपुरवठा, वीज बिलमाफी, पीक नुकसान आणि दुष्काळी परिस्थिती या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील फडवणीस सरकारने या अनुषंगाने राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करीत मदतीची घोषणा केली आहे.
केळी पीक विम्यातील तफावत दूर करण्याची मागणी
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांसाठी सन 2025-26 मधील पीक विमा भरपाईतील तफावत दूर करून शेतकर्यांना योग्य व न्याय्य भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून विमा भरपाई निश्चित करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.
कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करा
कृषी पंपांसाठी सुरू असलेले वीज लोडशेडिंग कमी करून शेतकर्यांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही आमदार जावळे यांनी केली. वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
वीज बिल माफीचा मुद्दाही लावून धरला
शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफ करावे तसेच साडेतीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकर्यांनाही वीज बिलमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली.
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
पावसातील खंड आणि निर्माण झालेल्या पीक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणीही त्यांनी जोरदारपणे शासनासमोर मांडली. पिकांचे नुकसान लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा, कृषी पंपांना नियमित वीज, पीक कर्ज उपलब्धता आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ शेतकर्यांना मिळावा, याबाबतही आमदार जावळे यांनी संबंधित विभागांचे लक्ष वेधले.
रब्बी हंगामालाही बसणार फटका
यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असतानाच यामुळे रब्बीच्या पिकांना देखील फटका बसणार आहे. यामुळे शेतकरी नैराश्यात असून त्याला मदतीचा हात देण्याची आवश्यकता असल्याकडे देखील आमदार अमोल जावळे यांनी या बैठकीत लक्ष वेधले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर केवळ आढावा न घेता त्यावर ठोस आणि तातडीची कार्यवाही व्हावी, अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी बैठकीत मांडली. संकटग्रस्त शेतकर्यांना आवश्यक मदत व दिलासा मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.