चिनावल गावातील केळी उत्पादक शेतकर्याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडत संपवले जीवन
सावदा पोलिसांकडून कट्टा व दोन जिवंत राऊंड जप्त : आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चिनावल, ता.रावेर (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : चिनावल गावातील रहिवासी असलेल्या केळी उत्पादक शेतकर्याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्म्हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार, 6 रोजी रात्री 12.5 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेने मात्र रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. निर्मल युवराज महाजन (27, रा.चिनावल, ता.रावेर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
रात्रीच्या वेळी उचलले पाऊल
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चिनावल गावातील रहिवासी निर्मल महाजन हा शेती व्यवसायासोबत केळीचा व्यापार करतो. सोमवारी रात्री 12.05 वाजेच्या सुमारास तरुणाने राहत्या घराच्या तिसर्या मजल्यावर जात गावठी कट्टा डोक्याच्या उजव्या बाजूला लावत गोळी झाडली.
गोळीबाराचा आवाज ऐकून कुटूंबातील सदस्यांनी नातेवाईकांनी धाव घेतल्यानंतर निर्मल हा रक्तबंबाळ अवस्थेत दिसताच मोठा आक्रोश करण्यात आला तर या घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सावदा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. मृताच्या चेहर्यावर उजव्या डोळ्याजवळ अंदाजे सहा मिलिमीटर आकाराचे गोलाकार छिद्र आढळल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांकडून गावठी कट्टा जप्त
सावदा पोलिसांना माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व सहकार्यांनी धाव घेतली. मयत तरुणाच्या घरातून गावठी कट्टा, पाच खाली केस तसेच दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी सावदा पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, तरुणाने गोळी झाडून आत्महत्या का केली? गावठी कट्टा का व कुठून आणला? या प्रश्नांची उकल करण्याचे काम सावदा पोलिसांकडून सुरू आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.


