एक हजारांची लाच भोवली : आमोदा तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
सातबारा उतार्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी मागितली लाच : लाचखोर हादरले
गणेश वाघ
यावल (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : सातबारा उतार्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच स्वीकारताना यावल तालुक्यातील आमोदा तलाठ्याला जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने महसूल वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शैलेश अंकुश झोटे (सौभाग्यनगर, रावेर, मूळ रा.मेहकर, जि.बुलढाणा) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
दरम्यान, एकीकडे जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आधीच अडचणीत असताना आता महसूल प्रशासनातील लाचखोर शेतकर्यांना वेठीस धरत असल्याचा प्रकारही यातून समोर आला आहे.
काय आहे प्रकरण
तक्रारदार हे 36 वर्षीय शेतकरी आहेत. शासन योजनेंतर्गत सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सातबारा उतार्यावर कुपनलिकेची नोंद आवश्यक असल्याने त्यांनी आमोदा तलाठी शैलेश झोटे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी कामाच्या बदल्यात चार हजारांची लाच मागितली होती व त्यावेळी तक्रारदाराने तीन हजार पाचशे रुपये दिले होते मात्र 2 ऑक्टोबर रोजी तक्रारदार कामाबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर तलाठी झोटे यांनी उर्वरीत पाचशे रुपयांची लाच व सातबारा उतार्यांची नोंद देण्यासाठी पाचशे रुपये मिळून एकूण एक हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडतळणी करून सापळा रचण्यात आला. मंगळवारी ठरल्याप्रमाणे लाच रक्कम देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदार आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लाच देण्यासाठी आल्यानंतर तलाठी झोटे यांनी लाच स्वीकारली व पथकाला तक्रारदाराने इशारा करताच आरोपी तलाठ्याला अटक करण्यात आली. या कारवाईने आमोदासह यावल तालुक्यातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हवालदार सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर, मनोज पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.
