तीन अपत्यांचा फटका : यावल पालिकेतील काँग्रेस नगरसेवक अपात्र

पालिकेतील सत्ता समीकरणे बदलणार ! सत्ताधार्‍यांची संख्या एकने घटली


यावल (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : तीन अपत्य प्रकरणी दाखल तक्रारीची दखल घेत यावल पालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक शेख निसार यांना अपात्र घोषीत करण्यात आल्यानंतर पालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा निकाल शुक्रवारी नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्तांनी दिला. या निकालामुळे नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्याची स्थिती आहे.

काय आहे प्रकरण ?
यावल नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक पाच अ चे काँग्रेसचे नगरसेवक शेख निसार हमीद यांच्याविरूध्द तीन अपत्यप्रकरणी उमेश रेवा फेगडे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेख निसार हमीद यांना चार अपत्ये असून त्यांच्या एका अपत्याचा (अन्सार अहमद) जन्म 06 जून 2003 रोजी झाल्याचा दावा पुराव्यांसह मांडण्यात आला. शेख यांनी आपल्या उमेदवारी अर्जा सोबत दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात 12 सप्टेंबर 2001 नंतर एक ही आपत्य जन्मास आले नसल्याचे म्हटले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणी दिनांक 4 व 18 ऑगस्ट रोजी व पुन्हा 18 सप्टेंबर रोजी सुनावण्या घेण्यात आल्या. यात शेख निसार यांना असलेल्या चार अपत्यांपैकी चौथ्या आपत्याचा जन्म सन 2003 मध्ये झाल्याचे सिध्द झाले व त्या नुसार त्यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, 1965 च्या कलम 16(1)(के) अन्वये नगरसेवक पदावरून अनर्ह (अपात्र) घोषित करण्यात आले.

निकालानंतर उडाली खळबळ
जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त जनार्दन पवार यांनी या संदर्भात आदेश प्रसिध्द केला. या निर्णयानंतर नगरपालिकेतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. शेख निसार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निकाला विरूध्द आपण अपिलाता जाणार असल्याचे सांगितले.

पोट निवडणुक होणार ?
प्रभाग क्रमांक पाच हा काँग्रसेचा बालेकिल्ला असून व आता येथे पुन्हा पोटनिवडणूक झाल्यास ती जागा पुन्हा कुणाकडे जाईल ? व निवडणुकीनंतरच्या निकालाने पालिकेत समीकरणे बदलतील का? या विषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेससह भाजपा, महायुतीकडून आता याबाबत व्यूहरचना केली जात असल्याचे समजते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !