युपीकडून भिवंडीकडे जाणारा दोन लाखांच्या भांगेच्या गोळ्या जप्त

धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई ; सुगंधी अगरबत्तीसह 18.98 लाखांचा मुद्देमाल जप्त


धुळे (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : युपीच्या कानपूरहून सुगंधी अगरबत्तीच्या आड भांगेच्या गोळ्यांची भिवंडीकडे वाहतूक होत असताना धुळे तालुका पोलिसांनी कारवाई करीत सुमारे दोन लाखांच्या भांगाच्या गोळ्या जप्त केल्या तर दोन संशयीतांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 18 लाख 98 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची अवैध विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरून अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे परिसरात संशयीत आयशर (एम.एच.04 एलक्यू.1870) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यामध्ये भांगेच्या गोळ्या आढळून आल्या.

वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी दोन लाख सहा हजार 700 रुपये किंमतीच्या भांगेच्या गोळ्या (चारमिनार त्रैलोक्य विजया वटी व पावर मुनक्का वटी), आठ लाख 92 हजार 80 रुपये किंमतीची सुगंधी अगरबत्ती व आठ लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन मिळून 18 लाख 98 हजार 780 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. चालक जमशेद अहमद जुल्फेकार अहमद शाह (35) व क्लीनर हबीबुज्जमा कामरुज्जमा अन्सारी (39, दोन्ही रा.मियाका पुरवा, कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश, ह.मु.भिवंडी, जि.ठाणे) यांना गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी, अंमलदार नितीन चव्हाण, कुणाल पानपाटील, चेतन कंखरे, विशाल पाटील, निलेश पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !