यावल शहरात तरुणाला मारहाण : नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा


यावल (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : यावल शहरातील विश्व ज्योती चौकात 27 वर्षीय तरुणावर हल्ला करीत त्यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नगरसेवक सागर चौधरीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाला हातातील कडे चेहर्‍यावर गालाजवळ मारून जबर दुखापत करीत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

काय घडले यावल शहरात ?
शहरातील विश्व ज्योती चौकातील रहिवाशी दिनेश गोपाळ चौधरी (27) या तरुणाने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार यावल नगरपरिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक सागरकुमार सुनील चौधरी हे गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास विश्वज्योती चौकात आले व तुम्ही निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात काम केले, असे सांगून व निवडणुकीतील राग धरून त्यांनी व त्यांच्यासह सचिन रवींद्र चौधरी, अभिजीत विलास गुरव, प्रशांत अरुण गुरव या चार जणांनी तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. नगरसेवक सागर चौधरी यांनी त्याच्या हातातील कड्याने त्याच्या चेहर्‍यावर डाव्या गालाच्या जवळ मारून जबर दुखापत केली व त्याला ठार मारण्याची धमकी दिली.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या या तरुणाच्या आई-वडिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !