भुसावळातील शासकीय तांत्रिक विद्यालयाला माजी आमदार स्व.डी.के.चौधरींचे नाव

राज्यातील 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याचा शासन निर्णय


भुसावळ (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र शासनाने राज्यातील 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने बुधवार, 21 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, वरणगाव, जामनेर आणि मुक्ताईनगर तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विद्यालयांचाही या निर्णयात समावेश आहे. भुसावळातील माजी आमदार व आयुष्यभर कामगारांचे नेते म्हणून कार्य करणार्‍या स्व.डी.के.चौधरी यांचे नाव शासकीय तांत्रिक विद्यालयाला देण्यात आल्याने भुसावळकरांमधून या निर्णयाचे कौतुक होत आहे.

तांत्रिक विद्यालयाला माजी आमदार डी.के.चौधरींचे नाव
भुसावळच्या शासकीय तांत्रिक विद्यालयाला माजी आमदार डी.के. चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार, भुसावळ येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण डी.के.चौधरी शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ असे करण्यात आले आहे.

नगरपालिकेपासून नगराध्यक्ष ते आमदार पदापर्यंतचा प्रवास
1970 ते 1974 या काळात दादासाहेब चौधरी भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे 1975 मध्ये लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकारली. जनतेच्या पाठिंब्यामुळे ते भुसावळचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी सुविधा आणि गरीब नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले. शहराच्या विकासकामांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.

सत्तेला मानले जनसेवेचे साधन
1985 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भुसावळ मतदारसंघातून त्यांनी जनता पक्षाच्या उमेदवाराच्या भूमिकेत निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षाचे उमेदवार अख्तरअली काझी यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवत त्यांना पराभूत केले व आमदार म्हणून विजयी झाले. आमदारकीचा संपूर्ण काळात त्यांनी विकास व जनतेची सेवा केली. व त्यानंतरच्या काळातही 2000 पर्यंत त्यांनी नगरसेवक म्हणून काम करत नागरिकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. स्व.दादासाहेब चौधरी यांनी राजकारणाला केवळ सत्तेचे माध्यम न मानता जनसेवेचे साधन मानले.

वरणगावातील विद्यालयाला कवी केशवसूतांचे नाव
जळगाव येथील विद्यालयाला डॉ.अविनाश आचार्य यांचे, तर वरणगाव येथील विद्यालयाला कवीवर्य केशवसुत यांचे नाव देण्यास मान्यता मिळाली आहे. जामनेर येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव भंवरलाल जैन शासकीय तांत्रिक विद्यालय, जामनेर तर मुक्ताईनगर येथील विद्यालयाला दगडू राठोड यांचे नाव देण्यात आले आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील बदल
धुळे जिल्ह्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव वैद्य प्र.ता.जोशी शासकीय तांत्रिक विद्यालय, धुळे तर साक्री येथील विद्यालयाला नानासाहेब पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. नंदुरबार येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामकरण बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार असे करण्यात आले आहे.

राज्यातील 25 विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता
शासन निर्णयामध्ये मुंबई शहर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील एकूण 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांचा समावेश आहे. इतर विद्यालयांमध्ये बदलापूर, मुरबाड, उल्हासनगर, तलासरी, जव्हार, रत्नागिरी, राजापूर, महाड, पेण, रोहा आणि शिरगाव येथील संस्थांचा समावेश आहे.

शासन निर्णयानंतर पुढील कार्यवाही
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 162 शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि माध्यमिक स्तरावर कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे, या पार्श्वभूमीवर ही विद्यालये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !