यावलला नगरसेवकावर चाकूहल्ला : यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल


यावल (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : यावल शहरातील चावडी जवळ नगरपालिकेचे नगरसेवक सागर चौधरी यांना काही कारण नसताना चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने लाकडी फटीने त्यांच्या डोक्यावर मारून कानाजवळ दुखापत केली तर एकाने धारदार चाकू सारख्या वस्तूने पोटावर मारून दुखापत केली. घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवकावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातील दुर्गा उत्सव विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास यावल नगरपालिकेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक तथा पालिकेचे गटनेता सागर सुनील चौधरी हे बारी चौकातून चावडीकडून आपल्या घरी पायी जात जात असताना सागर कांबळे यांच्या घरासमोर विलास रमेश चौधरी यांनी एका दुचाकीवर येऊन त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी गोपाल नारायण चौधरी, अक्षय गोपाल चौधरी, दिनेश गोपाल चौधरी या सर्वांनी त्यांना काही कारण नसताना ‘तू जास्त मातला आहे’ असे बोलून शिविगाळ करायला सुरुवात केली आणि वाद घालायला सुरुवात केली.

चाकूने हल्ला केल्याचा आरोप
यादरम्यानच दिनेश गोपाल चौधरी यांनी त्याच्या हातातील लाकडी फळीने त्याच्या डाव्या कानावर डोक्यावर मारून दुखापत केली तसेच अक्षय गोपाल चौधरी यांनी त्याच्या हातातील काहीतरी धारदार चाकू सारख्या वस्तूने त्याच्या पोटावर डाव्या बाजूला मारून दुखापत केली. ही घटना पाहून रस्त्याने येणारे नरेंद्र माळी व राहुल चौधरी यांनी तातडीने जखमी अवस्थेत सागर चौधरी यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. दरम्यान शुक्रवारी या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे.

नगरसेवकावरील चाकू हल्ल्याने खळबळ
शहरात रात्री नगरसेवकावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या बातमीमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या नगरसेवक सागर चौधरी यांच्यावर उपचार झाल्यानंतर अनेकांनी त्याची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !