जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची दमदार सुरवात ; शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध !

पारोळ्यात नलिनी पाटील, एरंडोलमध्ये मृणाल पाटील तर भुसावळमधून रजनीताई सावकारे यांची संचालकपदी निवड


जळगाव (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत सुरवात केली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेची मुदत संपल्यानंतर महायुतीच्या पारोळा, एरंडोल आणि भुसावळ येथील तीनही जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शिवसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका जागेचा समावेश आहे., या दिग्गजांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या रूपाने जिल्हा बँकेत नवीन चेहर्‍यांची वर्णी लागली आहे.

यांची झाली बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. निर्धारित वेळेत अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या तीन महत्त्वाच्या सोसायटी मतदारसंघातून उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, नलिनी पाटील या माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी आहेत, तर मृणाल पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी आहेत त्यामुळे या कुटुंबांमधील राजकीय वारसा आणि दबदबा आता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापर्यंत कायम राहिल्याचे दिसत आहे.

भुसावळातील मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी बिनविरोध
भुसावळ सोसायटी मतदारसंघातून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड झाली. या विजयामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या जागेवर आता त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून कामकाज पाहतील.

या तिन्ही जागा बिनविरोध झाल्यामुळे महायुतीने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपले खाते अत्यंत मजबूत रितीने उघडले आहे. या बिनविरोध विजयांमुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता उर्वरित जागांसाठी कोणकोण मदानात राहतो आणि अंतिम लढत कशी रंगते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !