पिंपळनेरमध्ये 30.91 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री मोठी कारवाई ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाने पिंपळनेर येथे मध्यरात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 20 हजार 382 पॅकेट्स जप्त करण्यात आले. जप्त साठ्याची किंमत 30 लाख 91 हजार 900 रुपये आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अन्न व औषध प्रशासनाला मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, पिंपळनेर येथे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पान मसाल्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे. या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकाने रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास भारत गॅस, ईदगापाडा, सटाणा रोड, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथे जाऊन तपासणी केली.






दोन्ही वाहनातून गुटखा जप्त
यावेळी वाहन (क्रमांक एम.एच.46 बी.एम. 6097 आणि एमएच 46 बीयू 7885) या क्रमांकांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. संबंधित ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला, गुटखा व तंबाखूचा साठा आढळून आला. पुढील कारवाईसाठी हा साठा पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. तपासणीदरम्यान एकूण 20 हजार 382 पॅकेट्स आढळून आले असून, त्यांची किंमत 30 लाख 91 हजार 900 रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी साहेबराव वंजी साबळे, गणेश वनजी साबळे आणि संदीप गुलाब ठाकरे (सर्व रा.बल्हाने, ता.साक्री) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहा.आयुक्त (अन्न), धुळे गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.
गुटख्याबाबत माहिती कळवण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पान मसाल्याच्या विक्री आणि साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.