पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेवर बलात्कार ! तीन पोलीस कर्मचार्‍यांना बेड्या

झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील घटना ; 12 पोलीस कर्मचारी निलंबित, 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल


झारखंड (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच गंभीर आरोप झाल्याने झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. सरायकेला जिल्ह्यातील गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरचा मुख्य आरोपी म्हणून समावेश असून, अटक करण्यात आलेल्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मदतीसाठी आलेल्या महिलेवर अत्याचाराचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पतीसोबत झालेल्या वादानंतर संबंधित महिला मदतीसाठी गम्हरिया पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिला ज्या खोलीत थांबविण्यात आले होते, त्याच खोलीत पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेतील शिस्त आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







12 पोलीस कर्मचारी निलंबित
या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांनी महत्त्वाची माहिती दिली. या प्रकरणात एकूण 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्तव्य बजावताना गंभीर निष्काळजीपणा, दिरंगाई आणि शिस्तभंग केल्याच्या आरोपाखाली 12 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आल्याचेही स्पष्ट केले.

एसआयटीकडून तपास सुरू
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. सर्व संबंधित बाबींची चौकशी सुरू असून, तपास अहवालाच्या आधारे दोषींविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.दरम्यान, महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्याकडून संताप व्यक्त
या घटनेवर झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना त्यांनी गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेवर पोलीस कर्मचार्‍याने बलात्कार केल्याचा आरोप अत्यंत लज्जास्पद आणि चिंताजनक असल्याचे म्हटले. तसेच, जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा नेमकी कोणाकडून करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपासातून नेमकी कोणती तथ्ये समोर येतात आणि संबंधितांवर पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !