इन्स्ट्राग्रामवर तरुणीसोबत महिनाभर चॅटींग, भेटण्यास बोलावून मुक्ताईनगराच्या चालकावर दोन गोळ्या झाडल्या : आठ हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध
भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : वरणगावजवळील फुलगाव पुलाखाली रविवार, 1 नोव्हेंबर सायंकाळी मुक्ताईनगरातील रहिवासी डंपर चालक सरफराज सैयद सकिर सैयद (24, रा.काझीपुरा, मुक्ताईनगर) या तरुणावर टोळक्याने हल्ला करीत दोन गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी डाव्या खांद्याला तर दुसरी गोळी पोटाच्या खालच्या भागात लागली व लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. दरम्यान, तरुणाचे एका महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर चॅटींग सुरू होते व त्यानंतरच्या ओळखीतून तरुणीने जखमीला भेटण्यासाठी बोलावल्यानंतर टोळक्याने हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली भेटीचे निमित्त
वरणगाव पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सरफराज या तरुणाची सुमारे महिनाभरापूर्वी इन्स्टाग्राम चॅटिंगच्या माध्यमातून वरणगावातील तरुणीशी ओळख झाली होती. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिने त्याला फुलगाव पुलाखाली मुक्ताईनगरकडे जाणार्या सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार सरफराज तेथे पोहोचल्यानंतर काही वेळातच मागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला त्यामुळे तो जमिनीवर कोसळला.






त्यानंतर सात ते आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. यात त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. याचवेळी टोळीतील एका व्यक्तीने गावठी कट्ट्यातून सरफराजच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या त्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरणगाव पोलीस ठाण्यात सरफराज सैय्यद साकिर सैय्यद (24, काझीपुरा, मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिल्यावरून आठ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.
दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण काय, इन्स्टाग्रामवरून भेटीसाठी बोलावणार्या तरुणीची या घटनेशी काही भूमिका आहे का आणि हल्लेखोरांची ओळख कोणत्या माध्यमातून पटणार, याचा तपास पोलीस करीत आहेत. गोळीबार करून सात ते आठ जणांचे टोळके पसार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.