भुसावळच्या नागरी समस्यांवरून पालिकेची सभा तापली !
अस्वच्छता, पाणीटंचाई आणि पथदिव्यांवरून महिला नगरसेविकांचा आक्रमक पवित्रा ; सांडपाणी कराचा प्रस्ताव नामंजूर, सातारा शिवारातील आरक्षणाचा विषय तहकूब
भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : दिवाळीचा सण जवळ येत असताना भुसावळ शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या समस्यांवरून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. विशेषतः महिला नगरसेविकांनी नागरिकांच्या समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान, मालमत्ताधारकांवर सांडपाणी कर लागू करण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला तर सातारा शिवारातील आरक्षणासंदर्भातील विषय तहकूब करण्यात आला.
प्रभारी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत पालिकेची सभा
प्रभारी अध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार, गटनेते युवराज लोणारी, बबलू बर्हाटे, उपमुख्याधिकारी शेख परवेज यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते मात्र विरोधी नगरसेवक सभेला गैरहजर होते.






स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांवरून प्रशासनाला जाब
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारावी, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि बंद अथवा अनियमित पथदिव्यांची समस्या दूर करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. सणासुदीच्या काळात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका सभेत मांडण्यात आली. पथदिवे सकाळी 6.30 वाजता बंद करण्याबाबतही चर्चा झाली. या प्रश्नांवर मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
स्वच्छतेचा मुद्दा तापला
शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून सभागृहात जाब विचारण्यात आला. नगरसेवकांचे फोन उचलून त्यांच्या तक्रारींची दखल घेतली पाहिजे, असे मुख्याधिकारी पवार यांनी संबंधित अधिकार्यांन बजावले.
सांडपाणी कराचा प्रस्ताव नामंजूर
सभेत एकूण 39 विषयांवर सुमारे दोन तास चर्चा झाली. मालमत्ताधारकांना सांडपाणी कर लागू करण्याच्या प्रस्तावावर नगरसेवक गिरीश महाजन यांनी हरकत घेतली. त्यानंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला त्यामुळे मालमत्ताधारकांवर प्रस्तावित नव्या कराचा भार पडणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सातारा शिवारातील आरक्षणाचा विषय तहकूब
मौजे सतारे शिवारातील सर्वे क्रमांक 58/6 मधील आरक्षण क्रमांक 14 अंतर्गत मुलांचे खेळाचे मैदान आणि आरक्षण क्रमांक 15 अंतर्गत प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी राखीव असलेल्या एकूण 0.50 आर क्षेत्राबाबत खरेदी सूचना नोटीस बजावण्यात आली होती. या विषयावर सभेत चर्चा होऊन तो तहकूब करण्यात आला.
नगरपरिषद संचलित एम.आय. तेली उर्दू हायस्कूलमधील विनाअनुदानित शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यासंदर्भातील विषयदेखील शासनस्तरावर प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने तहकूब करण्यात आला.
घनकचरा प्रकल्प नगरोत्थान योजनेतून राबविण्याची सूचना
शहरातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. जिल्हाधिकार्यांनी कचरा डेपोला भेट देऊन आवश्यक सूचना केल्याची माहिती देण्यात आली. शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नगरोत्थान योजनेतून राबविण्यात यावा, असे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी सांगितले.
रस्त्यावरील मांस विक्री आणि अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
आयत्या वेळच्या विषयांमध्ये नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी रस्त्यावरील मांसविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. गवळीवाडा परिसरात थेट रस्त्यावर दुकाने थाटणार्या व्यावसायिकांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा विषयही त्यांनी मांडला. हनुमाननगर परिसरातील आरक्षित जागेवर वसलेल्या सुमारे 200 घरांचा प्रश्नही सभेत चर्चेला आला. या घरांमध्ये राहणार्या नागरिकांच्या नावे जागा करून प्रत्येकाच्या नावे सातबारा उतारा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर लक्ष देण्याची गरज
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये विकासकामे आणि प्रशासकीय मंजुरीच्या विषयांना प्राधान्य दिले जाते. मात्र, यावेळी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर विशेष चर्चा झाली. दिवाळीपूर्वी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची व्यवस्था सुधारण्याची मागणी नगरसेवकांनी केली. आता प्रशासनाकडून या समस्यांवर कितपत तातडीने कार्यवाही केली जाते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या काळात शहर स्वच्छ राहणार का, नागरिकांना नियमित पाणी मिळणार का आणि रस्त्यांवरील अंधार दूर होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.