दुष्काळाच्या निषेधार्थ 8 नोव्हेंबरला ‘चटणी-भाकर’ आंदोलन ; भुसावळात वंचित बहुजन आघाडीची घोषणा


भुसावळ (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कामगार वर्गाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रविवार, 8 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चटणी-भाकर’ आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून, यानिमित्त काळी दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भुसावळात शुक्रवार, 6 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सरकारच्या धोरणांचा निषेध
राज्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गाला बसत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांपर्यंत अद्याप ठोस उपाययोजना आणि मदत पोहोचलेली नाही. सरकारकडून दुष्काळाच्या परिस्थितीचे गांभीर्याने आकलन होत नसल्याने शेतकरी व शेतमजूर वर्ग अडचणीत सापडल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.









जिल्हाभरातील पदाधिकारी सहभागी होणार
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेत वंचितच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, राहुल इंगळे, रफीक बेग, पल्लवी गुरचळ, रुपेश साळुंके, संगीत खरे, नवनीत गायकवाड, अ‍ॅड.प्रवीण इंगळे, निलेश जाधव, मीरा वानखेडे, चांद तडवी, प्रवीण जमदाडे आणि संदीप बहिरुने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !