जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघ जाहीर
सांगलीत होणार्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी 12 खेळाडूंची जिल्हा संघात निवड
जळगाव (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सांगली येथे 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावतर्फे 4 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या निवड चाचणी स्पर्धेतून महिला व पुरुष गटातील एकूण 12 खेळाडूंची जळगाव जिल्हा संघात निवड करण्यात आली. महिला गटातून 65 ते 70 किलो वजन गटात आयुषी भोसले, 45 ते 48 किलो वजन गटात हर्षा सपकाळे, 51 ते 54 किलो वजन गटात संध्या मोरे, 57 ते 60 किलो वजन गटात दिशा पाटील आणि 70 ते 75 किलो वजन गटात श्रृती सोनावे यांची निवड झाली.








पुरुष गटातून 50 ते 54 किलो वजन गटात प्रथमेश नरवाडे, 65 ते 70 किलो वजन गटात गौरव बारसे, 70 ते 75 किलो वजन गटात नागेश खरारे, 70 ते 80 किलो वजन गटात गौरव बहारे, 80 ते 85 किलो वजन गटात आशुतोष गौतम, 85 ते 90 किलो वजन गटात भावेश ठाकूर आणि 91 किलोपेक्षा अधिक वजन गटात लोकेश देवकर यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्हा संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये चमक दाखविणारे नागेश खरारे आणि दिशा पाटील यांचा समावेश असल्याने संघाच्या कामगिरीबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाळा मोरे, राष्ट्रीय प्रशिक्षक मध्य रेल्वे भुसावळ व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या युथ अॅण्ड एज ग्रुप कमिशनचे चेअरमन निलेश बाविस्कर, सचिव चुनीलाल गुप्ता, उपाध्यक्ष धनराज कसाट, विशाल बाविस्कर, दीपक वाल्डे, डॉ.शारूख पिंजारी, राष्ट्रीय बॉक्सर रोहित पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आगामी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगावचा संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी जळगाव जिल्ह्या बॉक्सिंगचे अध्यक्ष नरेंद्र अरुण मोरे यांनी व्यक्त केला.