शालार्थ घोटाळ्यातील पसार विनोद तराळांच्या शोधासाठी सूचक दिलीप पाटलांची अडीच तास चौकशी
जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जावरील स्वाक्षरीचा तपास ; चौकशीदरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ
जळगाव (रविवार, 8 नोव्हेंबर 206) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने मुक्ताईनगरातील राजकीय वातावरण तापले असतानाच शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित विनोद तराळ यांच्या उमेदवारी अर्जाने तपास यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही पोलिसांना सापडत नसलेल्या तराळ यांच्या शोधासाठी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने आता जिल्हा बँकेच्या निवडणूक अर्जाचा आधार घेतला आहे. याच अनुषंगाने शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल होत तराळ यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी करणारे दिलीप पाटील यांची तब्बल अडीच तास चौकशी केली.
गोंधळामुळे तापले वातावरण
तराळ यांनी अर्जावर स्वाक्षरी कधी आणि कुठे केली, ते सध्या कुठे आहेत आणि त्यांच्या संपर्कात कोण आहेत, यासंदर्भात पोलिसांनी माहिती घेतली. दरम्यान, चौकशी सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.








नाशिक रोड पोलिसात गुन्हा
विनोद रामदास तराळ यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात शालार्थ आयडी गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 ऑगस्ट 2026 रोजी तर मुंबई उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतरही ते तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत.
अनुमोदकांच्या माहितीचा माग काढण्यास सुरुवात
पसार असतानाच तराळ यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची बाब समोर आली. अर्जावर त्यांची स्वाक्षरी असल्याने ते प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यासाठी कुठे उपस्थित होते, याचा तपास करण्याची मागणी अंतुर्ली येथील अक्षय सुधीर महाजन यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जावरील सूचक आणि अनुमोदकांच्या माहितीचा माग काढण्यास सुरुवात केली असून शनिवारी दिलीप पाटील यांची चौकशी करण्यात आली.
सही कुठे झाली? तराळांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली
चौकशीदरम्यान पोलिसांनी दिलीप पाटील यांच्याकडे विनोद तराळ यांच्या उमेदवारी अर्जावरील स्वाक्षरी नेमकी कुठे आणि कशी झाली, अर्ज दाखल करताना तराळ उपस्थित होते का, त्यांचा सध्याचा ठावठिकाणा काय आहे आणि ते कोणाच्या संपर्कात आहेत, याबाबत सविस्तर विचारणा केली. अडीच तासांच्या चौकशीनंतर पाटील यांना गाव न सोडण्याच्या अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
चौकशीला विरोध ; शिवसेना कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ
दिलीप पाटील यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. विनोद तराळ यांना अटक करू नये, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध दर्शविला. यावेळी गोंधळामुळे चौकशीच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज देत तपासात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्यानंतर परिस्थिती शांत झाली.
तराळांच्या उमेदवारीने मुक्ताईनगरच्या राजकारणात नवे समीकरण?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसतानाच मुक्ताईनगरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँक खडसेमुक्त करण्याचा नारा दिल्यानंतर भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. या राजकीय पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाशी संबंधित विनोद तराळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. शालार्थ आयडी गैरव्यवहाराच्या प्रकरणात आरोपी असलेले तराळ अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारी अर्जावरील स्वाक्षरी तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा दुवा ठरली आहे. ऐन अर्ज माघारीच्या टप्प्यात आर्थिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर गाठून सूचकाची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.