बोदवडमध्ये गुन्हेगारीविरोधात जनआक्रोश ! कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन : उपअधीक्षक अशोक नखाते यांचे शहर भयमुक्त करण्याचे आश्वासन ; अत्यावश्यक सेवाही पहिल्यांदाच बंदमध्ये सहभागी
बोदवड (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : बोदवड शहरातील वाढती गुंडगिरी, टोळक्यांची दहशत आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यात बोदवड पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ रविवारी बोदवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने नागरिकांमधील संतापाचा उद्रेक झाला. या पार्श्वभूमीवर व्यापारी, विविध राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, केमिस्ट संघटना आणि वैद्यकीय संघटनांनी एकत्र येत बंदची हाक दिली. या बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवांनीही प्रथमच बंदमध्ये सहभाग नोंदविला.
मूक मोर्चानंतर ठिय्या आंदोलन
रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद होती. त्यानंतर सकाळी 11 वाजता गांधी चौकातून बोदवड पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात व्यापारी, उद्योजक, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील गुंडगिरी, महिलांची व मुलींची छेडछाड, टोळक्यांची दहशत तसेच पोलिसांकडून गुन्हेगारांना मिळणार्या कथित अभयाचा तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.
पोलीस प्रशासनाला विचारला जाब
मोर्चा पोलिस ठाण्यावर पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. शहरातील अवैध धंदे, 50 टक्के व्याजदराने सुरू असलेली कथित अवैध सावकारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारे संरक्षण याबाबत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारला. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरातील दहशतीचे वातावरण संपवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
पोलीस प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीचे आश्वासन मिळत नसल्याने संतप्त मोर्चेकर्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येऊन मागण्यांबाबत ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
तासाभरानंतर अपर पोलीस अधीक्षक दाखल
सुमारे एक तासानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि तक्रारी जाणून घेतल्या. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यासंदर्भात पोलीस निरीक्षकांनाही आवश्यक सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराला भयमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर तब्बल दोन तास चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्चात विविध पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग
या मोर्चात नगराध्यक्षांचे पती दिनेश माळी, नगरसेवक जाफर शेख, कैलास चौधरी, डॉ.उद्धव पाटील, विनोद पाडर, हरिओम जैस्वाल, मेहतर वाल्मीक समाज महाराष्ट्र अध्यक्ष मिथुन बारसे, अकोला वाल्मीक समाज अध्यक्ष उमेश लखन, बुलढाणा येथील नगरसेवक विनोद बेंडवाल, बावणी पंचायतचे किशोर टीवाल, अतीश सारवान, मनोज छपरीबंद, डी.के.पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
