भुसावळच्या उत्कर्ष कलाविष्कार नाट्यसंस्थेला राज्यस्तरीय ‘प्रयोगकला सन्मान’ जाहीर


भुसावळ (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील उत्कर्ष कलाविष्कार या नाट्यसंस्थेला राज्यस्तरीय प्रायोगिक नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘प्रयोगकला सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. थिएटर वर्कशॉप कंपनीने उत्कर्षचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांना या निवडीबाबत पत्राद्वारे कळवले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्यप्रयोगकला महोत्सवांतर्गत उत्कर्ष कलाविष्कार संस्थेला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थेतर्फे 33 नाटकांची निर्मिती
गेल्या 35 वर्षांपासून प्रायोगिक नाट्य कला क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून नाट्यकला, सांस्कृतिक चळवळ आणि कलाविष्काराच्या माध्यमातून समाजमन समृद्ध करण्यासाठी उत्कर्ष कलाविष्कार संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. आतापर्यंत संस्थेने 33 नाटकांची निर्मिती केली असून राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरी पर्यंत अनेक पारितोषिके पटकावले आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून खान्देश नाट्य महोत्सवाचे सातत्याने आयोजन करणारी अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे तसेच दोन वर्षांपूर्वी नाट्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणार्‍या मानसरंग महोत्सवात बजाज फाउंडेशन प्रायोजित नाट्यवृत्तीने सुद्धा संस्थेचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांच्या वतीने रवींद्र दामले उत्कृष्ट प्रायोगिक संस्था या महत्वाच्या पुरस्काराने संस्थेस सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या या प्रदीर्घ कला प्रवासाची आणि रंगकर्मी अनिल कोष्टी आणि उत्कर्षाच्या सर्वच रंगकर्मींच्या नाट्य क्षेत्रातील अविरत आणि समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

24 रोजी पुरस्काराचे वितरण
पिंपरी-चिंचवड परिसरात सन 2023 पासून ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्यप्रयोगकला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रायोगिक नाट्यसंस्था, पारंपरिक लोककला सादर करणार्‍या संस्था तसेच विविध सांस्कृतिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. या महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण (निगडी), पिंपरी-चिंचवड येथे संपन्न होणार आहे. उत्कर्ष कलाविष्कार संस्थेला हा सन्मान जाहीर झाल्याने भुसावळच्या सांस्कृतिक व नाट्य वर्तुळात आनंद व्यक्त होत असून समाजाच्या विविध स्तरांतून संस्थेच्या कलावंतांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कलात्मक वाटचालीस नवी प्रेरणा आणि कलावंतांना ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !