मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण वेळापत्रकात सुधारणा : 22 डिसेंबरला होणार मतदार यादीचे अंतिम प्रकाशन
जळगाव (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांची गणना तसेच मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी विविध टप्प्यांच्या मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एएसडीडी यादीतील मतदारांना 18 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत गणना फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार गणना फॉर्मची निर्मिती व छपाई 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 18 ते 30 नोव्हेंबरदरम्यान गणना फॉर्मचे वितरण व संकलन करण्यात येईल. प्राप्त गणना फॉर्मचा निपटारा आणि निर्गतीची प्रक्रिया 10 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतींच्या अर्जांचा निपटारा करण्यासाठी 15 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी नोटीस टप्पा व हरकती निकाली काढण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2026 ते 15 डिसेंबर 2026 असा नमूद करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेनंतर 22 डिसेंबर 2026 रोजी मतदार यादीचे अंतिम प्रकाशन केले जाणार आहे.
मतदारांनी सहकार्य करावे
एसडीडी यादीमध्ये समावेश असलेल्या सर्व संबंधित मतदारांनी विशेष दक्षता घेऊन गणना फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आवश्यक माहिती व संबंधित कागदपत्रांसह पूर्ण भरलेले गणना फॉर्म आपल्या परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा मतदार नोंदणी कार्यालयाकडे वेळेत जमा करावेत तसेच नागरीकांनी व सर्व राजकीय पक्षांनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि मतदार यादी त्रुटीरहीत व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
