मासिक पाळीमुळे खाकीचे स्वप्न राहणार नाही अधुरे ! पोलीस भरतीतील तरुणींना मिळणार विशेष संधी ; योगेश कदमांची मोठी घोषणा


मुंबई (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणार्‍या राज्यातील महिला उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या दिवशी मासिक पाळीमुळे शारीरिक त्रास जाणवणार्‍या तरुणींना आता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची वेळ येणार नाही. अशा उमेदवारांना वैद्यकीय तपासणीनंतर 4 ते 6 दिवसांची विशेष मुदतवाढ देऊन पर्यायी दिवशी शारीरिक चाचणीची संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.

यंदाच्या पोलीस भरतीतच तरतूद करण्यासाठी प्रयत्न
पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान महिला उमेदवारांना मासिक पाळी किंवा अन्य आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात येईल, असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले. यासाठी संबंधित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना 4 ते 5 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्याची तरतूद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाच्या पोलीस भरतीच्या अधिसूचनेतच या विशेष सवलतीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच पोलीस महासंचालकांशीही यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे कदम यांनी नमूद केले. महिला उमेदवारांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन त्यांना न्याय्य संधी देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नैसर्गिक प्रक्रियेमुळे मेहनतीवर पाणी फेरले जाणार नाही
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, या काळात काही महिलांना तीव्र पोटदुखी, अशक्तपणा, थकवा आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवतो. अशा परिस्थितीत धावणे, गोळाफेक आणि इतर शारीरिक चाचण्या देणे कठीण होऊ शकते. पोलीस भरतीसाठी अनेक तरुणी महिनोनमहिने कठोर सराव करतात. मात्र, ऐन चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेमुळे एखाद्या उमेदवाराची संधी हिरावली जाऊ नये, या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

तरुणींकडून निर्णयाचे स्वागत ; अधिकृत आदेशाची प्रतीक्षा
राज्य सरकारच्या या घोषणेचे पोलीस भरतीची तयारी करणार्‍या तरुणींनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे महिला उमेदवारांना आरोग्याच्या समस्यांमुळे भरती प्रक्रियेत नुकसान सहन करावे लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या सवलतीसाठी वैद्यकीय तपासणीचे निकष काय असतील, पर्यायी चाचणीची तारीख कशी निश्चित केली जाईल आणि ही सुविधा नेमकी कोणत्या पद्धतीने लागू होणार, याबाबत गृह विभागाकडून अधिकृत नियमावली प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाच्या अंतिम आदेशाकडे पोलीस भरतीच्या महिला उमेदवारांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !