धुळे जिल्ह्यातील रामीतील भुमिपूत्राला वीरमरण
धुळे (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : मणिपूरमधील इंफाळ पूर्व जिल्ह्यातील लमलाई चालौ येथे लष्करी वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात धुळे तालुक्यातील रामी येथील जवानाला वीरमरण आले. ही धक्कादायक घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली. जयेश हिंमत माळी (24) असे वीर जवानाचे नाव आहे. ते भारतीय सैन्यदलाच्या 357 फील्ड हॉस्पिटल युनिटमध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत होते.
18 नोव्हेंबर रोजी इम्फाळ पूर्व येथील चालौ परिसरात गस्तीदरम्यान सैन्यदलाचे वाहन घसरून तलावात कोसळले. या दुर्घटनेत पाण्यात बुडून आणि श्वास गुदमरल्याने जयेश यांची प्रकृती गंभीर झाली. स्थानिक नागरिक आणि क्विक रिअॅक्शन टीमने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
जवानाचा मृतदेह शनिवारी रामी येथे येणार असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. धुळे तालुक्यातील रामी येथील जवान जयेश माळी हा अवघ्या दोन वर्षांपूर्वीच सैन्यदलात भरती झाला होता. तो मणीपूर येथे कर्तव्यावर होता. 18 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ पूर्व जिल्ह्यातील लमलाई चालौ येथे 8व्या बिहार रेजिमेंटच्या बख्तरबंद लष्करी वाहनातून ते प्रवास करत असताना त्यांचे वाहन इताम नदीत कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 29 वर्षीय कॅप्टन हनुमान राम यांचाही मृत्यू झाला तर काही वेळाने जवान जयेश हिंमत माळी (24) यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच इतर जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामी गावात शोककळा
जयेश यांच्या वीरमरणाचे वृत्त गावात पसरताच शोककळा पसरली. जयेश माळी यांचे कुटुंब सर्वसामान्य परिस्थितीतील असून, कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. वडिलांचे कष्ट, शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
