टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड ; फरार अभिषेक पंडितविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी
मुंबई (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास आता आर्थिक व्यवहारांच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून, या प्रकरणातील फरार आरोपी अभिषेक पंडितविरोधात मुंबई क्राईम ब्रँचने लुकआऊट सर्क्युलर (ङजउ) जारी केले आहे. अभिषेक देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी टोळीचे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मास्टरमाइंड अनिल पंडितचा भाऊ अभिषेक फरार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या अनिल पंडितचा अभिषेक पंडित हा भाऊ आहे. गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना आर्थिक मदत आणि पाठबळ पुरवण्यात अभिषेकचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो टोळीच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अभिषेकला अटक करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे पथक हरियाणातील कर्नाल येथे पोहोचले होते. मात्र, पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच तो फरार झाला. त्यामुळे त्याने देशाबाहेर पलायन करू नये, यासाठी पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी केले आहे.
पत्नी सुनेहा पंडितच्या पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान, या प्रकरणात अभिषेक पंडितची पत्नी सुनेहा पंडित हिला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष मकोका न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीत 21 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. तिच्या पतीच्या बँक खात्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयात सांगितले की, सुनेहाचा पती अभिषेक शर्मा याच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांचा गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का, याची पडताळणी सुरू आहे. अभिषेकला अटक झाल्यास टोळीचे आर्थिक व्यवहार, निधीचे स्रोत आणि आर्थिक नेटवर्क याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
18 ऑक्टोबरला जुहू परिसरात झाला होता गोळीबार
18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. राजस्थानमधील कोटा, दिल्ली आणि हरियाणातील सोनीपत येथून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान या प्रकरणातील महिला आरोपीचा संघटित गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे वाढवण्यात आली.
आता फरार अभिषेक पंडितविरोधात एलओसी जारी झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अभिषेकच्या अटकेनंतर या गोळीबारामागील आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण गुन्हेगारी टोळीचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.
