भुसावळमध्ये भरदिवसा तीन बंद फ्लॅट फोडले : पाच लाख 85 हजारांचा ऐवज लंपास !
तुकाराम नगरातील स्वामी नारायण व श्री श्री अपार्टमेंटमध्ये घरफोडी ; 3 ते 4 चोरटे इर्टिगा कारमधून आल्याची माहिती ; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू
भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. चोरट्यांनी भरदिवसा बंद घरांना लक्ष्य करीत तुकाराम नगरातील स्वामी नारायण अपार्टमेंट आणि श्री श्री अपार्टमेंटमधील तीन बंद फ्लॅटचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ही घरफोडी केली. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंद घराला टार्गेट
तुकाराम नगरातील स्वामी नारायण मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या स्वामी नारायण अपार्टमेंटमध्ये तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यरत असलेले प्रमोद बाबुराव पांढरे (51) हे कुटुंबासह राहतात. गुरुवारी सकाळी सुमारे 9 वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असताा त्यांच्या पत्नीही नोकरीनिमित्त कठोरा येथे गेल्या. दरम्यान, दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्यांना एका परिचित डॉक्टरांच्या पत्नीचा फोन आला. त्यावेळी त्यांच्या घरासह अपार्टमेंटमधील दुसर्या घरात आणि पाठीमागील श्री श्री अपार्टमेंटमधील एका घरातही चोरी झाल्याची माहिती मिळाली.
तीन ठिकाणी चोरी
घरी पोहोचल्यानंतर पांढरे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरातील कपाटांमधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्याचप्रमाणे वरच्या मजल्यावर राहणारे डॉ.प्रवीण सुधाकर देशमुख यांच्या घराचाही कडी-कोयंडा तोडण्यात आला होता. पाठीमागील श्री श्री अपार्टमेंटमध्ये राहणार्या ग्रामसेविका मनिषा ज्ञानेश्वर बंड यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला. स्वामी नारायण अपार्टमेंटमधील पाठक यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
तीन घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
प्रमोद पांढरे यांच्या घरातून दोन लाख रुपये किंमतीच्या 81 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, दहा ग्रॅमची सोन्याची चेन, दोन सोन्याच अंगठ्या, 20 ग्रॅमचे टोंगल, चांदीचे जोडवे व पैंजण, तसेच 65 हजारांची रोकड मिळून पाच लाख 85 हजारांचा ऐवज चोरीला गेला.
दोन घरातूनही ऐवज चोरीला
डॉ.प्रवीण देशमुख यांच्या घरातून दीड ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीची वाटी, चांदीचे शिक्के, करंडे, एक हजार रुपये रोख आणि वाहनांच्या चाव्या चोरट्यांनी लंपास केल्या तर मनिषा बंड यांच्या घरातून साडेआठ ग्रॅमचे मंगळसूत्र, सोन्याचे गोळे, सोन्याचा ओम, नथ, चांदीची अंगठी, चांदीचे दोन जोड आणि नऊ हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला.
इर्टिगा कारमधून आले हचोरटे?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे चार चोरटे सात आसनी इर्टिगा कारमधून परिसरात आल्याची माहिती आहे. एकाच वेळी एकाच परिसरातील तीन बंद घरांना लक्ष्य करण्यात आल्याने चोरट्यांनी यापूर्वीच परिसराची पाहणी (रेकी) केली असावी, असा संशय व्यक्त आहे. रहिवाशांच्या घराबाहेर पडण्याच्या वेळेची माहिती घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने ही घरफोडी करण्यात आल्याचा अंदाज आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयित वाहनांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि चोरीला गेलेल्या ऐवजाचा शोध घेण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. तिन्ही घरफोड्यांमध्ये परस्पर संबंध आहेत का, तसेच यापूर्वीच्या घरफोड्यांशी काही धागेदोरे जुळतात का, याचाही तपास सुरू आहे. भरदिवसा अपार्टमेंटमधील तीन बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
