धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई : चाकूच्या धाकावर 10.75 लाखांच्या लुटीचा उलगडा ; दोघांना अटक
सहा लाख 35 हजारांची रोकड जप्त : अन्य पसार संशयीतांचा कसून शोध
धुळे (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : कापूस विक्रीतून मिळालेले रक्कम घेवून घरी परतणार्या शेतकर्याला चाकूचा धाक दाखवून तब्बल 10 लाख 75 हजार 250 रुपयांची लूट करण्यात आली होती. लूट करणार्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. विशेष म्हणे आरोपींना पकडले न जावू यासाठी इन्स्टाग्रामवर संभाषण केले व तांत्रिक तपासात हाच तपासासाठी महतवाचा धागा ठरला. दोन आरोपींकडून लुटीतील सहा लाख 36 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
उड्डाणपुलाखाली शेतकर्याला चाकूचा धाक लूटले
धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील करमाड येथील शेतकरी ज्ञानेश्वर पितांबर पाटील हे फागणे शिवारातील अमळनेर चौकाजवळील उड्डाणपुलाखालून जात असताना आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून अडवले. त्यांच्याकडील कापूस विक्रीतून मिळालेले 10 लाख 75 हजार 250 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
इन्स्टाग्रामवरील संभाषणातून पोलिसांना मिळाला महत्त्वाचा धागा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार केली. पोलिसांनी जुन्या गुन्हेगारांची माहिती, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, संशयितांच्या इन्स्टाग्रामवरील संभाषणांचे विश्लेषण आणि मोबाईल क्रमांकांच्या तांत्रिक तपासातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार तपास पथकाने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आणि बागलाण परिसरात जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकडी निष्पन्न : दोघांना अटक
पोलिसांनी पिंपळगाव-बागलाण भागातून खुशाल उर्फ मन्या अशोक मोकळ (25, रा.मोहाडी, दंडेवालाबाबा नगर, ता.धुळे) यास ताब्यात घेतल्यानंतर चौकशीतून या लुटीचा उलगडा झाला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे राधाकौर जर्नेलसिंग सरदार (50, रा.मोहाडी, दंडेवालाबाबा नगर, ता.धुळे) हिलाही अटक करण्यात आली आहे. तलवारसिंग जर्नेलसिंग सरदार (28, रा.मोहाडी, दंडेवालाबाबा नगर, ता.धुळे) व रवींद्र वाघ (रा.मोहाडी, दंडेवालाबाबा नगर, ता.धुळे) व अन्य एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने जबरी लूट झाल्याचे तपासात समोर आले आहे.
लुटीतील 59 टक्के रक्कम हस्तगत
पोलिसांनी अटक केलेल्या खुशाल उर्फ मन्या मोकळकडून तीन लाख 45 हजार रुपये तर राधाकौर सरदारकडून दोन लाख 91 हजार रुपये जप्त केले. एकूण जप्त रक्कम सहा लाख 36 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अल्पवयीनाने लुटीतील रक्कम आई राधाकौरकडे दिल्याने तिला अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकुमार पवार, उपनिरीक्षक अनिल अलवाल, कैलास माळी, प्रशांत राठोड, कुणाल पानपाटील, ललित खळगे, मुकेश पवार, विशाल पाटील, रवींद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, प्रमोद पाटील, भावेश झिरे, राहुल देवरे, महेंद्रसिंग गिरासे, गजेंद्र मुंडे आदींनी ही कारवाई केली.
