अमळनेरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी विराट मोर्चा


अमळनेर (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : अमळनेर शहरातील कत्तलखान्यात वारंवार गोवंश कत्तल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस येताच बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक आणि हिंदू संघटनां संतप्त होत कत्तलखाना कायमस्वरूपी उध्वस्त करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, 27 प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिकेसमोर उपोषण छेडण्यात आले.

मोर्चाने वेधले लक्ष
शहरातील तिरंगा चौकापासून प.पू.गोविंददास महाराज (नंदगाव), प.पू.सुशील महाराज (विटनेर), राष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत हरिहरा नंदगिरी उर्फ दादू महाराज, किन्नर आखाड्याच्या महंत गौरीताई, राकेश (रोहा), डॉ.संजय शहा, विजय पाटील, विश्वहिंदू परिषद बजरंग दलाचे प्रखंड संयोजक सचिन माळी, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, विश्वनाथ मिस्त्री, स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. पाचपावली चौकातून लाल बाग शॉपिंग जवळून मोर्चा नगरपरिषदेवर धडकला.

घोषणांनी शहर दणाणले
घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चेकर्‍यांनी कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात यावा, दोषींवर कारवाई करण्यात यावी , मुख्य आरोपींना मोक्का लावण्यात यावा, निष्काळजी करणार्‍या पालिका कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अनधिकृत कत्तलखान्याचे शेड आणि खोल्या तातडीने उध्वस्त करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर केले.

कत्तलखाना बंदच : नगराध्यक्ष
मोर्चाला सामोरे जातांना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षीत बाविस्कर, प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात आला असून त्याला सील लावण्यात आल्याचे व त्याठिकाणी कॅमेरे लावून कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली.

कत्तलखान्याची इमारत पाडण्यासाठी प्रशासन परवानगी घेणार
खासदार स्मिता वाघ, सभापती साहेबराव पवार, सभापती कैलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, श्रीराम चौधरी, विक्रांत पाटील, सुरज परदेशी, प्रताप साळी, डिगंबर महाले, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर तसेच हिंदू संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी अतिक्रमित खोल्या तातडीने काढण्यात येतील व तातडीची बैठक घेऊन कत्तलखान्याची इमारत पाडण्यासाठी शासनाची परवानगी घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

मोर्चामुळे वाहतूक ठप्प : दुकाने बंद
कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी आजच निर्णय घ्या म्हणून ठामपणे उपोषण सुरूच ठेवले होते. शहरात भाजीपाला व्यावसायीक, बिल्डिंग व्यावसायीक, किराणा व इतर व्यापारी, सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवली. शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मोर्च्यात सुमारे अडीच तीन हजार कार्यकर्ते सामील झाले. गर्दी असल्याने धुळे चोपडा रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !