वरणगावात आठ लाखांची प्रतिबंधीत तंबाखू पकडली
वरणगाव पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई : पाठलाग करून पकडला ट्रक
वरणगाव : गुजरात येथून नागपूरकडे तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याची माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ ट्रकचा पाठलाग करून पकडत भांड्यांच्या खाली लपवलेली व राज्यातील प्रतिबंधीत असलेली सुमारे आठ लाखांची तंबाखू जप्त केली. शनिवारी ही कारवाई करण्यात आली तर सोमवारी अन्न व औषध प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोये व सहकार्यांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ सापळा रचत ट्रक (क्रमांक एम.42 बी.जी.8266) थांबवून तिची तपासणी केली असता भांड्याच्या खाली तंबाखू लपवली असल्याचे उघड झाले. सोमवारी अन्न-सुरक्षा विभागाचे के.आर.साळुंखे यांनी फिर्याद दिल्यावरून वरणगाव पोलिसात अन्न सुरक्षा व मानके 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आठ लाखांच्या तंबाखूसह सुमारे 20 लाखांचा
ट्रक जप्त करण्यात आला. ट्रक चालक व क्लिनर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

