बोदवडसह तालुक्यात जनता कर्फ्यूदरम्यान कृषी केंद्र सुरू ठेवावेत


शेतकरी संघटनेचे बोदवड तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन

बोदवड : शहरात वाढत जाणार्‍या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे शहरात आठवड्यातून तीन दिवस (शुक्रवार, शनिवार व रविवार) शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. बंद दरम्यान केवळ औषधी दुकाने तसेच दवाखाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र शेती विभागाशी संबधीत कृषी दुकानेही बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या 31 मार्चच्या पत्रात संचारबंदीच्या काळातही कृषी दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश असताना शहरात दुकाने बंद राहत असल्याने गैरसोय होत आहे तर यापुढे मात्र कृषी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी तहसीलदार हेमंत पाटील यांच्याकडे केली आहे.

तर कर्मचार्‍यांवर कारवाई करावी
बोदवड तालुका हा पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीचे काम जर वेळेवर झाले नाही तर शेतकरी वर्षभर कशी उपजिवीका करेल तसेच पिकांसाठी वेळेवर बियाणे, खते मिळाली नाही तर त्याची मेहनत वाया जाईल त्यामुळे कृषी सेवा केंद्र अत्यावश्यक सेवेत सुरू ठेवावीत तसेच दमदाटी करून कारवाईसाठी येणार्‍या नगरपंचायत कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, असेही पत्रकात नमूद आहे. निवेदनावर पुरुषोत्तम पाटील, प्रवीण मोरे, नाना पाटील, राजु चौधरी, प्रभाकर चौधरी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !