भुसावळ-अंजाळे येथील बॅक वॉटर पूलाचे ‘हरीसागर’ व्हावे नामकरण


भाजपा पदाधिकार्‍यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

यावल : दोन वेळा खासदार व आमदार राहिलेल्या स्व.हरीभाऊ जावळे यांचे 16 जून रोजी निधन झाल्याने त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. केळी या शेतीमालासाठी तसेच केळी उत्पादक शेतकर्‍यांसाठी स्व.हरीभाऊंनी नेहमीच संघर्षाची भूमिका ठेवली व संपूर्ण आयुष्यभर सिंचनाचे प्रश्न, सूक्ष्म सिंचन, माती-पाणी परीक्षण, नदीचे सर्वेक्षण, केळी प्रक्रिया उद्योग आदी विषयांच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्यावर उपाय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्व.हरीभाऊ जावळे यांच्या स्मृती कायम जतन होण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श अनेकांना मार्गदर्शक होण्यासाठी भुसावळ ते अंजाळे येथील बॅक वॉटर पूलाचे नामकरण ‘हरीसागर’ करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

तहसील प्रशासनालाही दिले निवेदन
यावल तालुक्याच्या दक्षिणेकडे कोट्यवधी रुपये खर्च करून शेळगाव प्रकल्प उभारला जात असून या महत्वांकांक्षी धरणाचे कार्य शेवटच्या टप्प्यात असून शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे परीसरातील शेतकर्‍यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेळगाव प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी स्व.जावळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सातत्याने पाठपुरावा केल्याने स्मृती जतन करण्यासाठी भुसावळ ते अंजाळे येथील बॅक वॉटर पूलाचे नामकरण ‘हरीसागर’ करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात यावल तहसीलदार जितेंद्र कुवर व निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांनाही निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे, यावल शहराध्यक्ष निलेश गडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रीतेश बारी आदींची प्रसंगी उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !