भुसावळात कडकडीत बंद : 200 वर दुचाकीस्वारांवर कारवाई
भुसावळ : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी 7 ते 13 दरम्यान भुसावळसह जळगाव व अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण शहर कडकडीत बंद दिसून आले मात्र त्यानंतरही काही नागरीक दुचाकीवर बाहेर पडल्याने त्यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत सुमारे 200 हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. तोंडाला मास्क न लावणे, डबल सीट दुचाकीवर प्रवास तसेच कागदपत्रे नसणे तसेच विनाकारण बाहेर पडणार्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी दिली.
अपर पोलिस अधीक्षक भुसावळात तळ ठोकून
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी मंगळवारी शहराला भेट देवून विविध भागांची पाहणी केली तसेच पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाईच्या त्यांनी सूचना करीत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्याकडून परीस्थितीचा आढावा घेतला.

