गुरु-शिष्य नाते एकमेकांना पारखून करावे
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज
फैजपूर : गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणे म्हणजे गुरुपौर्णिमा दिवसाचे महत्व कमी करणे असून आपण या दिवशी मानव जन्म नेमका कशासाठी ? याचे चिंतन केल्यास खरा गुरुपौर्णिमा दिवस साजरा होईल. रोग्याला औषधी न देता ती त्याच्या खिशात ठेवले किंवा औषधीची आरती केली तर रोग्याचा आजार बरा होणार नाही तर ती त्याला सेवन करावी लागेल त्याच प्रमाणे वरवर प्रणाम करून नुसतेच गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या म्हणून तो उत्सव साजरा झाला असे नसून गुरूने दिलेले वचन, नियम, उपासना, आराधना, आदेशाचे पालन केल्यास गुरुपौर्णिमा हा दिवस खर्या अर्थाने साजरा होईल, असे विचार सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि नऊ ते साडे दहा यादरम्यान आपल्या हजारो भक्तांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आशीर्वचन दिले.
मंदिरातून केले भाविकांना मार्गदर्शन
दरवर्षी गुरुपौर्णिमेला सतपंथ मंदिर संस्थानमध्ये चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटाने साजरा केला जातो. यात परदेशी नागरिकांसह गुजरात, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातून हजारो भाविक हजेरी लावतात व गुरूंचा आशीर्वाद घेतात. यावेळी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता महाराजांनी मंदिरात बसून जगभरात असलेल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले.
वेळेचा सदुपयोग गरजेचा
आपल्याजवळ संपत्ती किती आहे हे प्रत्येकाला माहिती असते मात्र प्रत्येकाजवळ वेळ किती आहे हे माहिती नसते म्हणून प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. पैशापेक्षा ही वेळेला जास्त महत्त्व दिले पाहिजे. फालतू कामासाठी वेळ वाया घालू नये असा महत्वपूर्ण संदेशही जनार्दन महाराज यांनी दिला. भक्तांचे प्रमुख पाच लक्षण आहे त्यात आर्त, अर्थाथी, जिज्ञासु, ज्ञानी आणि निष्काम भक्ती या लक्षणांपैकी मानवाने कलियुगात निष्काम भक्ती म्हणजेच श्रीकृष्ण चरीत्रात गोपीजींची भक्ती या लक्षणाचा अवलंब केल्यास निश्चित परमेश्वर प्राप्तीचा व सुखाचा अनुभव येतो. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी औषधोपचार आहे मात्र मनाच्या व्याधीवर परमेश्वराचे नाम, जप आणि साधना हीच महत्त्वाची आहे असे सांगून त्यांनी शेवटी सर्वांना स्वस्त रहा, सुरक्षित रहा, महामारीच्या संकटाची भीती बाळगू नका व शासनाचे नियम पाळा असा मौलिक उपदेश केला.

