भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात


40 हजारांची लाच भोवली : जळगाव एसीबीची कारवाई

भुसावळ : चारचाकी चालकावर हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपीला टार्चर न करण्यासह गुन्ह्यात वापरलेले वाहन सोडण्यासाठी तसेच आरोपी व तक्रारदाराच्या भावावर सरकारी कामात अडथळा न आणल्याच्या कलमाखाली कारवाई टाळण्यासाठी 40 हजारांची लाच मागणार्‍या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचारी छोटू वैद्य यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील कल्पना रसवंतीवर अटक केली. या कारवाईने भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली.

आरोपीला टॉर्चर न करण्यासाठी मागितली लाच
महेश नगराकडे जाणार्‍या रस्त्यावर चारचाकी उभी केल्याने झालेल्या वादातून चारचाकी चालक सतीश यादव बाविस्कर (43, काशीनाथ नगर, भुसावळ) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळ संशयीत आरोपी योगेश देविदास तायडे (महेश नगर) व तुषार शंकर जाधव व मंगेश अंबादास काळे (कृष्णनगर, भुसावळ) यांनी चाकूहल्ला केला होता. या गुन्ह्यातील एका संशयीताच्या भावाकडे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी छोटू वैद्य यांनी आरोपीस टॉर्चर न करण्यासह गुन्ह्यातील जप्त चारचाकी सोडण्यासाठी तसेच तक्रारदाराला शासकीय गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 40 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदल्यानंतर बुधवारी रात्री सापळा रचण्यात आला. आरोपीने तक्रारदाराला कल्पना रसवंतीवर बोलावून लाच स्वीकारताच पंचांसमक्ष आरोपीला अटक करण्यात आली.जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. दरम्यान, रात्री उशिरा आरोपीच्या घराची झडती सुरू होती.


कॉपी करू नका.