यावलच्या तरुणाकडून ‘पादुका’ लघूपटाची निर्मिती
शॉर्ट फिल्म खान्देशी भाषेत : नवीन कलाकारांना मिळाली संधी
यावल : शहरातील रहिवासी व खान्देशच्या मातीत जन्माला आलेल्या मयुर सोनवणे यांनी आपल्या भागातील काही नवीन कलाकारांना सोबत घेत पुण्यातील ‘आपला कट्टा-मराठी अड्डा’ या गु्रपच्या माध्यमातून एका लघू चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे. ‘पादुका’ असे या लघू चित्रपटाचे नाव असून त्याचे पोस्टर पुणे येथे एका छोटेखानी कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. सदरची शॉर्ट फिल्म ही आपल्या खान्देशी भाषेत असणार आहे.
नवीन कलाकारांना मिळाली संधी
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शुटिंग पुणे येथे ऑगस्टनंतर केली जाणार आहे. मयुर वसंत सोनवणे यांची ही पहिलीच शॉर्ट फिल्म असून दोन शॉर्ट फिल्म व एक वेब सिरीजदेखील करणार आहेत.त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ही कलाकार असतील. चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शन स्वतः मयुर सोनवणे करणार आहेत. त्यात मुख्य भूमिकेसाठी अनुष्का मारुती पाटील, संतोष शिराळे, प्रतीक्षा सुर्यवंशी, योगेश्वर चित्ते, ज्योतीबा अनभुले, रवी निर्माळे, प्रतिभा भोसले, संजय मुंडीक, वैष्णवी माळी, धनराज अटवाल, संजय मकासरे, सुशांत मुंडीक, कृष्णा सोनवणे, अर्चना कुळकर्णी, रसिता शिंपी, पूर्णानंद मेहेंदळे, गौरव पाटील, अमोल मोहिते, संकेत शिंदे इत्यादी कलाकार या लघू चित्रपटात आपली भुमिका साकारणार आहे.
नवोदीत कलाकरांना अभिनयाची संधी
पुढील चित्रपटामधील विविध भूमिका साकारण्यासाठी ते आपल्या गावातील कलाकारांना संधी देण्याची त्यांची इच्छा आहे. नाट्य क्षेत्रात काम करायची इच्छा असलेल्या तरुण प्रतिभावान कलाकारांना आपल्या अभिनयाव्दारे कला प्रदर्शित करण्याची ही सुवर्ण संधी आहे. चित्रपटात काम करण्यासाठी मयुर सोनवणे ह्यांचा 9168150415 ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

