शेतात स्वखर्चाने डीपी बसवण्याचा निर्णय अन्यायकारक
शासनाने नियमात तत्काळ करावा बदल : आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी
यावल : तालुक्यात पारंपरीक पद्धतीने नवीन वीज कनेशक्शन देण्याचे महावितरण कंपनीने बंद केले आहे शिवाय स्वतः शेतकर्यांने पैसे खर्च करून आपल्या शेतात डी.पी.बसविण्याचा निर्णय हा शेतकरी बांधवांना मान्य नसल्याने शासनाने घेतलेले निर्णय तत्काळ बदल करून पूर्वीप्रमाणेच शेतकर्यांना वीज जोडणी करून मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एका निवेदनाव्दारे रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे करण्यात आली.
शासन निर्णय शेतकर्यांना मान्य नाही
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यात जुन्या व पारंपारीक पद्धतीने शेतकर्यांना नवीन वीज कनेक्शन देणे बंद करण्यात आले आहे. स्वतः पैसे खर्च करून आपल्या शेतात डी.पी.बसविण्याचा शासन निर्णय शेतकरी बांधवांना मान्य नाही. यावल तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी कर्ज काढुन आपल्या शेतात विहिरी खोदल्या आहेत तर पाईपलाईन देखील टाकलेली आहे. शेतातीत आपली पिके वाचविण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली असतांना आता शेतकरी बांधवांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने कर्जबाजारी झालेले शेतकरी आता हतबल झाले आहे. वीज कनेक्शन आवश्यक असलेल्या शेतकर्यांना वीज कनेक्शन देणे बंद करण्यात येवून उच्च दाब वितरण प्रणाली एच.व्ही.डी.एस अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफार्मरचा पर्याय देण्यात आला आहे.
शासनाने निर्णय बदलण्याची गरज
या सर्व गोंधळलेल्या विषयामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात वीज पोहचविणे थांबले असून विजेअभावी शेतातील शेतमाल प्रक्रिया यंत्र, अवजारे, मळणी यंत्र तसेच रात्रीच्या वेळी वन प्राण्यापासून पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे यंत्र विजेअभावी बंद पडल्याने कष्टकरी शेतकरी बांधव हे चांगलेच संकटात सापडला आहेत. राज्य शासनाने शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करून सरसकट वीज जोडणी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून तो शेतकर्यांच्या हिताचा नाही. शासनाने पूर्वीप्रमाणे पारंपरीक वीज जोडणी द्यावी तसेच शेतात डीपी बसवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन देताना मनसेचे यावल शहराध्यक्ष चेतन अढळकर, मनसेचे संजय नन्नवरे, विरेंद्र राजपूत, आबीद कच्छी, साहिल बडगुजर, अजय तायडे उपस्थित होते. दरम्यान, या प्रश्नाबाबत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून यातून कसा मार्ग काढता येईल ? याबाबत निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदारांनी दिली. दरम्यान, यावल-भुसावळ मार्गावरील रस्त्याच्या दर्जाबाबत तसेच डोंगरकठोरा ते सातोद वड्री दरम्यान पठाणकोट जंगली रस्त्यावर सुरू असलेल्या निर्माणधीन पुलाच्या कामाचे छत कोसळ्याच्या विषय गांभीर्याने घेतला असल्याचेही आमदार म्हणाले. कोरोनामुळे मतदार संघातील मतदारांशी संपर्क होवुन न शकल्याने आपण जवळच्या काळात काही दिवसातच मतदारांशी हितगुज साधुन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क अभियान सुरू करणार असल्याचे आमदार चौधरी म्हणाले.

