वड्री धरणात सावखेडासीमचा तरुण बुडाला


युद्ध पातळीवर शोधकार्य सुरूच : भावाला वाचवण्यात आले यश

यावल : तालुक्यातील वड्री येथील धरणात पोहण्यासाठी गेलेला सावखेडासीम येथील 22 वर्षीय तरुण पाण्यात बेपत्ता झाला तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बुडणार्‍या त्याच्या भावाला वाचविण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सावखेडासीम येथील फिरोज वसीम खाटीक हा युवक आपल्या मित्र व भावासह तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वड्री येथील धरणात रविवारी सायंकाळी पोहण्यास गेला होता. याप्रसंगी तो पाण्यात बुडाला. त्याच्या भावासह मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र यातील कुणालाही पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड केली मात्र उपयोग झाला नाही. त्याचा भाऊ शाहरूख खाटीक याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याला पोहता येत नसल्यामुळे तो देखील बुडू लागला मात्र उपस्थितांना त्याला वाचविण्यात यश आले.

पोलिसांची घटनास्थळी धाव
यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी माहिती मिळताच तातडीने पोलिसांना घटनास्थळी त्यांनी रवान केले. बेपत्ता युवकाचा शोध सुरू असून अद्यापपर्यंत तो मिळुन आलेला नाही. आपल्या भावाला मी पाण्यात बुडतांना पाहिले पण पोहता येत नसल्याने भावास वाचविता आले नसल्याची खंत व दुःख त्याचा भाऊ शाहरूख खाटीक याने व्यक्त केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !