भुसावळचे मुख्याधिकारी रमाकांत डाकेंना जिल्हाधिकार्‍यांनी बजावली नोटीस


नगरपालिकेवर पुन्हा प्रभारी राज : चोपडा मुख्याधिकार्‍यांकडे पदभार

भुसावळ : भुसावळ पालिकेत प्रभारीराज कायम असून नूतन मुख्याधिकारी पदभार घेवूनही नंतर पालिकेत न फिरकल्याने त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे तर तूर्त पदभार चोपडा मुख्याधिकार्‍यांकडे सोपवण्यात आला आहे. कामठी, जि. नागपूर येथून बदली होऊन आलेले मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी 8 जुलै रोजी भुसावळ पालिकेचा पदभार घेतला होता मात्र त्यानंतर ते पालिकेत आले नाहीत. या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी डाके यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत चोपडा येथील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे प्रभारी पदभार दिला आहे.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसीत म्हटले आहे की, नगरविकास विभाग मुंबई यांचे शासन आदेशाने 7 जूलै रोजी रमाकांत डाके यांची भुसावळ पालिकेवर बदलीने पदस्थापना करण्यात आली. त्यांनी 8 जुलै रोजी तातडीने पदभार घेतला. यानंतर 9 जूलैपासून मुख्यालयी हजर न होता ते रजा किंवा परवानगी न घेता मुख्यालय सोडून गेले आहेत, विनापरवानगी कुठलाही रजेचा अर्ज न मंजूर न करता गैरहजर आहात. सबळ कारणाशिवाय साथीच्या रोग काळात मुख्यालय सोडणे प्रतिबंधीत असतानाही आपण गैरशिस्तीने मुख्यालय सोडल्याचे आमचे ठाम मत आहे. यामुळे आपण कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. या कारणे दाखवा नोटीसीवर तीन दिवसांच्या आत आपला खुलासा सादर करावा, खुलासा सादर न केल्यास आपणास याबाबत काही सांगायचे नाही, असे गृहीत धरुन पुढील कारवाई केली जाईल, अशी तंबीही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, आता चोपडा येथील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे पूढील आदेशापर्यंत प्रभारी पदभार देण्यात आला आहे. याबाबतही जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !