भुसावळात उद्यापासून तीन दिवसीय द्वारकाई व्याख्यानमाला
‘शाळा आली घरात’ विषयावर प्रा.डॉ.जगदीश पाटील प्रथम पुष्प गुंफणार
भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झूम ऍपद्वारे 29, 30 व 31 जुलै तीन दिवस ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली असून सकाळी 10 वाजता या व्याख्यानमालेला प्रारंभ होईल. ऑनलाइन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील हे 29 जुलै रोजी ‘शाळा आली घरात’ हा विषय घेऊन ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाचं महत्व कसं वाढलं आहे हे त्यातून ते मांडतील. द्वितीय पुष्प डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय जळगावचे संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे हे 30 जुलै रोजी ‘बाप माझा सांगाती’ या विषयावर गुंफतील. कष्टकरी बापाच्या धडपड्या लेकरांची कहाणी व स्वानुभव ते मांडतील. तृतीय पुष्प हिंगोली जिल्ह्यातील सावळी खुर्द येथील शेतकरी कवी गणेश प्रल्हादराव आघाव हे गुंफतील. ‘कवितेचं शेतशिवार’ हा त्यांचा विषय असेल. शेताच्या बांधावर फुललेल्या कविता ते मांडतील.
ऑनलाईन व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही व्याख्याने ऑनलाइन झूम ऍपद्वारे, फेसबुक लाईव्ह आणि यु ट्यूब द्वारे होतील. ऑनलाईन व्याख्यानांचा लाभ शहरातील हजारो रसिक घेऊ शकतील, अशी माहिती जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे यांनी दिली.
आयोजन समितीत यांचा समावेश
द्वारकाई व्याख्यानमाला आयोजन समितीत जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडाळकर, फाउंडेशनचे सल्लागार समन्वयक गणेश फेगडे, बालभारतीचे सदस्य डॉ.जगदीश पाटील, प्रा.डॉ.जतीन मेढे, प्रा.आर.एच.पाटील यांचा समावेश आहे.

