भुसावळात रस्ते टाकणार कात


पालिकेच्या सभेत रस्ता कामांना सभागृहाची मंजुरी

भुसावळ : खड्ड्यांनी जर्जर झालेल्या भुसावळकरांना लवकरच दिलासा मिळणार असून शहरातील वर्दळीच्या रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण होणार आहे. शुक्रवारी पालिकेच्या विशेष सभेत सभागृहाने 1 ते 24 प्रभागासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला मंजुरी दिली. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा शेख सईदा शफी व गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते.

बाप्पांचे आगमन मात्र खडतर मार्गातून
16 कोटींच्या विशेष रस्ता अनुदानातून शहरातील रस्त्यांची कामे होणार असलीतरी बाप्पांच्या आगमनापूर्वी मात्र कामे होणार नसल्याने बाप्पांचे आगमन मात्र खडतर मार्गातून होणार आहे. शहरातील सर्वच रस्त्यांचे नव्हे आवश्यकतेनुसार रस्त्यांची कामे होतील, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

विरोधी गटाची सभेला पाठ
जनआधारच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली मात्र सभा संपल्यानंतर नगरसेविका पुष्पा सोनवणे सभागृहात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे विरोधी बाकावर कुणी नसल्याने तेथे सत्ताधारी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पिंटू कोठारी, अमोल इंगळे, चंद्रशेखर अत्तरदे, लक्ष्मी मकासरे यांनी बसत सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधले.


कॉपी करू नका.