भुसावळात नालेसफाई रखडली : काठावरील वस्त्यांनाही पुराचा धोका


भुसावळ (23 जून 2026) : शहरात नालेसफाई रखडल्याने नाल्यांमध्ये कचर्‍याचे ढीग साचले आहेत. खालम्मा दर्ग्याजवळील नाल्यावर तर कचरा थेट पुलापर्यंत पोहोचल्याने दमदार पाऊस झाल्यास जलप्रवाह बाधीत होऊन शेजारील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

सर्वसाधारण सभेची मंजुरी नसल्याने काम रखडले
पालिकेच्या गत काळातील तहकूब सभा, प्रभारी राजवट आणि विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता यामुळे यंदा मान्सूनपूर्व नालेसफाई ठप्प आहे. मार्चमध्ये मंजुरी मिळून एप्रिल-मे महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरीच मिळालेली नाही. यामुळे महत्त्वाचे काम खोळंबले आहे.

नालेसफाई न झाल्याने काठावरील व खोलगट भागातील खडका रोडच्या दोन्ही बाजूंच्या वस्त्या, पंचशील नगर, काझी प्लॉट, पापानगर, पाटील मळा भाग, मुख्य बाजारपेठेतील मरिमाता मंदिर, खाल्लमा दर्गा, विठ्ठल मंदिर वॉर्ड नाला, जामनेर रोड, महात्मा फुले नगर, भारत नगर, सतारे भाग, भिलवाडी परिसर, शिवपूर कन्हाळे रोड आणि हॉटेल सुहासचा परिसर या भागात तुंबई होऊ शकते.

रहिवाशांची व्हर्टिकल गार्डनची मागणी धूळ खात
शहरातून वाहणार्‍या बलबलकाशी व इतर नाल्यांच्या पुलांवर जाळी बसवून व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची मागणी अनेकदा झाली मात्र प्रशासन, सत्ताधारी व विरोधी पक्षांचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा टाकणार्‍यांवर एकदाही कारवाई होत नसल्याचे दुर्दैव आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !